विधानसभा निवडणुकीसाठी मोकळ्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक उपाय योजल्याचा दावा शनिवारी मुंबई पोलिसांनी केला. आचारसंहिता काळात ५११ शस्त्रे, आठ कोटींहून अधिकची रोकड, १६ लाखांचे अमलीपदार्थ, १० लाखांची दारू जप्त केली आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ३४ गुन्हे नोंदवले आहेत.

पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर, उपनगरांतील एकही मतदान केंद्र असुरक्षित नाही. मात्र २६९ मतदान केंद्रे विविध कारणांमुळे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. सोमवारीमतदान होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांवर दबाव आणण्याचे, कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे प्रसंग घडू नयेत यासाठी ४० हजारांहून अधिकचे मनुष्यबळ शहरात ठिकठिकाणी तैनात असेल. बंदोबस्तासाठी नेमलेल्या मुंबई पोलिसांना निमलष्करी दलाच्या २२ तर राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकडय़ा आणि २७०० गृहरक्षक जवानांची जोड मिळेल. याशिवाय शहरातील सर्व पोलीस ठाणी, दहशतवादविरोधी पथक, फोर्स वन, शीघ्र प्रतिसाद दल अशा विशेष पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील हजारो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची पडताळणी करण्यात आल्याचे आणि मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे बाधा न आणण्याची समज देण्यात आल्याचे, अशोक यांनी स्पष्ट केले. विविध न्यायालयांनी बजावलेल्या सुमारे दोन हजार अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, एमपीडीए आणि मोक्कान्वये दाखल गुन्हे, १६९ जणांची हद्ददपारीची कारवाई, सुमारे सात हजार जणांवर अन्य प्रतिबंधात्मक कारवाया केल्याचे अशोक यांनी सांगितले.