बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेणं यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? असा प्रश्न विचारत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर कठोर शब्दात शरसंधान साधलं. “ग्रँड हयात हॉटेलमध्ये आमच्याकडे बहुमत आहे हे दाखवण्याचा केविलवाणा आणि टुकार प्रयत्न झाला. यावेळी आमदारांना एक शपथ देण्यात आली. या शपथेमध्ये सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख होता. बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नाव घेऊन शपथ घेतली यापेक्षा दुर्दैवी काय? “असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला.

एवढंच नाही तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी हॉटेलमध्ये १६२ आमदार हजर असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे १४५ आमदार तरी होते का असाही प्रश्न शेलार यांनी विचारला. ग्रँड हयात या ठिकाणी आम्ही १६२ चा नारा देत महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार जमले होते. तिथे आमदारांना एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. यानंतर तातडीने आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाची शपथ घेतली. सत्ता येते, सत्ता जाते मात्र शिवसेनेने आज त्यांचं बेगडी हिंदुत्त्व सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नावाने घेतलेली शपथ ही शिवसेनेसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी लज्जास्पद आणि मान खाली घालायला लावणारी बाब आहे” असंही शेलार यांनी म्हटलं आहे.