News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच अनुच्छेद ३७० हटवणं शक्य झालं : अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांपासून प्रलंबित असलेले निर्णय मार्गी लावले असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं

फोटो सौजन्य: एएनआय

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच अनुच्छेद ३७० हटवणं शक्य झालं असं म्हणत पुन्हा एकदा भाजपालाच निवडून द्या असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भगवानगड या ठिकाणी केलं.  विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात. अशीच मात आपल्याला या निवडणुकीत करायची आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला निवडून द्या असं आवाहनही अमित शाह यांनी केलं.

भारतातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३०० पेक्षा जास्त जागा मिळवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७० रद्द करुन अवघा देश एक केला. त्यांनी मागील सत्तर वर्षांमध्ये प्रलंबित होते ते निर्णय पाच महिन्यात मार्गी लावले असं म्हणत अमित शाह यांनी मोदींचं कौतुक केलं तसंच त्यांचे हे कार्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांमध्ये पोहचवा असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

आपल्या भाषणात त्यांनी अनुच्छेद ३७० मुद्दा अधोरेखीत केल्यानंतर अमित शाह गोपीनाथ मुंडे आणि भगवानबाबा यांच्याकडे मोर्चा वळवला. भगवानबाबांनी त्यांचं सगळं आयुष्य समाजासाठी वेचलं. तसंच गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करत असतानाच समाजातल्या वंचित घटकांसाठी आणि उसतोड कामगारांसाठी आयुष्य वेचलं आता या दोघांच्या वाटेवर पंकजा मुंडे वाटचाल करत आहेत. त्याच पंकजा मुंडेंना तुमचा आशीर्वाद हवा आहे तो द्या आणि भाजपाला बहुमताने विजयी करा असंही आवाहन अमित शाह यांनी केलं. हे राजकीय व्यासपीठ नाही मात्र मला आनंद होतो आहे की महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ हा भगवानगडापासून झाला असंही शाह म्हणाले.

सावरगाव या ठिकाणी भगवानगडावर दसरा मेळावा साजरा झाला, त्यावेळी अमित शाह बोलत होते. त्यांच्या आधी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. भगवानगड या ठिकाणी ३७० तिरंगी ध्वज फडकवून आणि ३७० तोफांची सलामी देऊन अमित शाह यांना मानवंदना देण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:45 pm

Web Title: article 370 removed from kashmir only because of pm modi says amit shah in beed scj 81
Next Stories
1 अभिमानास्पद! महाराष्ट्रात उभारणार कृष्णविवरांचा शोध घेणारी ‘लायगो’ प्रयोगशाळा
2 Video : ‘दुर्गामाता दौड’मध्ये उदयनराजेंचा सहभाग
3 मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक : पंकजा मुंडे
Just Now!
X