29 May 2020

News Flash

विदर्भात रिपब्लिकन पक्षांमधील दुहीचा लाभ कुणाला?

वंचित बहुजन आघाडीने सर्वच जाती-जमातीच्या उमेदवारांना संधी देऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांमध्ये बेकी असल्याने विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. प्रकाश आंबेडकर, डॉ. राजेंद्र गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे होणारे मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडते, याचे औत्सुक्य राजकीय वर्तुळात आहे.

रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा विभाजनाचा आणि ऐक्य प्रक्रियेचा असताना आतापर्यंत सत्ता स्थापन करण्याच्या, प्रतिनिधित्व मिळवण्याच्या स्पध्रेत गटा-गटांमध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांना फारसे यश मिळाले नाही. रिपब्लिकन शक्तीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर भाजप आणि शिवसेनेनेही प्रयत्न केले. पण, एक-दोन गटच त्यांच्या हाती लागले. रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत दुहीमुळे दुरावलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी ‘बसप’नेही प्रयत्न केले होते. मध्यंतरीच्या काळात विदर्भात ‘बसप’च्या मतांची टक्केवारी त्यामुळे वाढली होती. पण, नंतर बसपचाही मतप्रवाह आटत गेला.

या वेळी बसप स्वबळावर रिंगणात आहे. विदर्भात जनाधार असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांपैकी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने एकूण ५७ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत एमआयएम त्यांच्यासोबत नाही. वंचित बहुजन आघाडीने सर्वच जाती-जमातीच्या उमेदवारांना संधी देऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, त्यांच्या उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन कुणासाठी लाभदायक ठरणार याचे औत्सुक्य आहे.

रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आहेत आणि नाहीतही. त्यांनी अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूर, दर्यापूरसह काही जागांची मागणी केली होती. अचलपुरातून स्वत: गवई लढण्यास इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने दर्यापूरमधून रिपाइंचे कार्यकर्ते बळवंत वानखडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. त्यामुळे गवई यांनी काँग्रेस विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सध्या दर्यापूर, अचलपूर या ठिकाणी ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत नाहीत, इतर ठिकाणी मात्र ते आघाडीसोबत आहेत.

जोगेंद्र कवाडे यांचा गट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आहे. रामदास आठवले यांचा गट गेल्या निवडणुकीप्रमाणे या वेळी भाजप-सेना युतीसोबत आहे. रिपाइंचे इतर गट मात्र विखुरलेले आहेत.

या वेळी बहुजन समाज पक्षानेही विदर्भात बहुतांश ठिकाणी उमेदवार उभे करून रिपब्लिकन पक्षांना आव्हान दिले आहे. रिपब्लिकन पक्षाचा खोब्रागडे गट, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), बहुजन विकास आघाडी, बहुजन महापार्टी यासह अनेक पक्षाचे उमेदवार या वेळी विदर्भातून काही ठिकाणी आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘रिपब्लिकन’च्या मर्यादा

विदर्भातील ३३ मतदारसंघांत निवडणुकांतील समीकरण बदलण्याची ताकद रिपब्लिकन पक्षांकडे आहे. पण, ही शक्ती विखुरली गेली आहे. रिपब्लिकन जनाधाराच्या स्वाभाविक मर्यादांमुळे रिपब्लिकन पक्षाचे विदर्भाच्या राजकारणातील अस्तित्व नष्टही होत नाही आणि ते राजकारणात एका मर्यादेपेक्षा जास्त वाढूही शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 12:57 am

Web Title: benefits from the duo of republican parties clash in vidarbha abn 97
Next Stories
1 आमची निवडणूक : टिपरी-पाणीचा खेळ झाला आहे..
2 आघाडीत टीकेलाही नेते उरले नाहीत – ठाकरे
3 काँग्रेसचे नेते भुरटे चोर, भाजपचे डाकू -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
Just Now!
X