महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १६२ आमदार सोमवारी संध्याकाळी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये जमले होते. ‘वी आर १६२’ असं या बैठकीला नाव देण्यात आलं होतं. यानिमित्ताने पहिल्यांदाच तीन पक्षांचे आमदार एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये सगळ्या आमदारांना एकजुटीची शपथ देण्यात आली. मात्र यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ओळख परेड आरोपींची होते आमदारांची नाही असं म्हणत या कार्यक्रमावर टीका केल्यानंतर आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. ही टीका करताना निलेश यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

सोमवारी ग्रँड हयातमध्ये झालेल्या कार्यक्रमावर निलेश यांनी टीका करताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नागणी डान्स करायलाही तयार होतील असा टोला लगावला आहे. “काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितलं तरी ते दोघ करणार,” असं निलेश ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना ते लिहितात, “एका गोष्टीच वाईट वाटलं शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखं दोन हॉटेल बदलून आणल गेलं आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.”

निलेश यांच्याआधी कालच रात्री पत्रकार परिषद घेऊन भाजापाचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी या बैठकीवरुन शिवसेनेवर टीका केली होती. “आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्त्व आहे,” असा टोला शेलार यांनी लगावला. “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल. पाच वर्षे दलित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठीचं काम करणार,” असंही शेलार यांनी यावेळी म्हटलं आहे.