महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन परस्परविरोधी विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कसे घडू शकते? असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. सिंचन घोटाळयात ज्या अजित पवारांवर आरोप केले त्यांच्यासोबतच फडणवीसांनी कशी शपथ घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. 

भाजपाने सिंचन घोटाळयाचा विषय लावून धरल्यामुळेच २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. पण आता त्याच अजित पवारांसोबत भाजपाने सरकार स्थापन केले आहे. हे अचानक एका रात्रीत घडलेले नाही. मागच्या दीडवर्षांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्रीपर्वाची सुरुवात झाली. विधानसभा अधिवेशनाच्याकाळात दोघांमधील संबंध सुधारत असल्याचे दिसत होते. 

मराठा आरक्षण आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील संबंध खराब झाले. पण त्याचवेळी फडणवीसांनी अजित पवार यांच्याबरोबर चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून फडणवीसांनी अजित पवारांवर मैत्री अधिक घट्ट केली. धनंजय मुंडे हे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपामधून झाली. प्रदेश भाजपामध्ये फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले होते. 

अजित पवारांविरोधातील सिंचन घोटाळयाची चौकशीही गोगलगायीच्या गतीने सुरु होती. हे सुद्धा दोन्ही नेत्यांमधील मैत्रीसंबंध दृढ होत असल्याचे लक्षण होते असे भाजपामधील एका नेत्याने सांगितले. चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी अजित पवारांनीही भाजपाशी हातमिळवणी करुन आपल्याला सुरक्षित केल्याचे सूत्रांनी सांगितले.  अजित पवार यांचा स्वभाव स्पष्टवक्तेपणाचा आहे. त्यामुळे काकांपेक्षा त्यांच्याशी हातमिळवणी करणे केव्हाही फायद्याचे असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे. 

आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करता अजित पवारांना सुद्धा शरद पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त जवळचे वाटतात. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अजित पवारांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला व नॉट रिचेबल झाले. तेव्हाच राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत फडणवीसांनी राष्ट्रवादीमधील याच मतभेदांचा फायदा उचलून सरकार स्थापन केले.