08 July 2020

News Flash

उल्हासनगरात सिंधूनगर मेट्रो स्थानक – मुख्यमंत्री

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून घोषणा

(संग्रहित छायाचित्र)

मेट्रो रेल्वे उल्हासनगर शहरापर्यंत आणून उल्हासनगरच्या मेट्रो स्थानकाला सिंधुनगर नाव देण्याची घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरात केली.

भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी फडणवीस उल्हासनगरात आले होते. शिवसेनेने सिंधुनगर या नामांतराला अनेकदा जोरदार विरोध केला आहे. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या समोरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली होती. उल्हासनगर ते मुंबई हा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच उल्हासनगरच्या मेट्रो स्थानकाला सिंधूनगर  नाव देऊन शहराची ओळख जपली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यंत्र्यांची दुहेरी खेळी?: उल्हासनगर शहराचे नाव बदलून सिंधूनगर करण्याची मागणी अनेकदा सिंधी समुदाय, भाजप आणि साई पक्षाने केली होती. मात्र अनेक वेळा शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणून नामांतराचा प्रस्ताव हाणून पाडला आहे. सिंधी मतदारांना भुलवण्यासाठी आणि शिवसेनेला खिजवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही नामांतराची घोषणा केल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांना घेराव  : मुख्यमंत्र्यांची  सभा संपल्यानंतर गैरव्यवहारामुळे र्निबध लागू केलेल्या पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी त्यांना घेराव घातला. त्यांची समजूत काढत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुका झाल्यानंतर हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

पवारांच्या दुसऱ्या नातवाचे पार्सलही परत पाठवा!

कर्जत (जिल्हा नगर): मावळमध्ये पार्थबापूचा पराभव केला, तसाच कर्जत-जामखेडमध्ये रोहितबापूचेही पार्सल परत पाठवा, असे आवाहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र सिद्धटेक  येथे केले. भाजप उमेदवार आणि जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला.  फडणवीस म्हणाले, शरद पवार यांचे राज्यातील राजकारणाचे दिवस आता संपले आहेत.दुसरे नातू रोहित पवार यांचाही पार्थ पवारप्रमाणे पराभव करून त्यांचे पार्सल बारामतीला परत पाठवा.

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यास प्राधान्य’

ठाणे :   भाजप-शिवसेना युती सरकारने गेल्या पाच वर्षांत मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाण्यात केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील संजय केळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर शुक्रवारी जाहीर सभा घेतली. या सभेला एकनाथ शिंदे, गणेश नाईक, विनय सहस्रबुद्धे  उपस्थित होते. मुंबई महानगर क्षेत्रात अवजड वाहतुकीमुळे कोंडी होते. ती सोडविण्यासाठी मल्टी मॉडेल कॉरिडोअर उभारण्यात येत असून यामुळे  दिलासा मिळणार आहे. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रोचा प्रकल्प  होणार असून असाच प्रकल्प कल्याण-डोंबिवलीत राबविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 1:02 am

Web Title: cm says ulhasnagar a metro station called sindhunagar abn 97
Next Stories
1 विदर्भात रिपब्लिकन पक्षांमधील दुहीचा लाभ कुणाला?
2 आमची निवडणूक : टिपरी-पाणीचा खेळ झाला आहे..
3 आघाडीत टीकेलाही नेते उरले नाहीत – ठाकरे
Just Now!
X