विधानसभा निवडणूक जवळ यायला लागल्यानंतर जागा वाटप उरकण्यासाठी युती आणि आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. युतीच्या आधी आघाडीचे जागा वाटप होण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. “विधानसभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणार असून, तर उर्वरित मित्रपक्षांसाठी ३८ जागां शिल्लक ठेवल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीबद्दल चर्चा सुरू आहे”, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड येथे दिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी पुण्यात होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणार आहे. तर आघाडीतील मित्रपक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहे. त्यातील काही जागा शिल्लक राहिल्या तर दोन्ही पक्ष समसमान वाटून घेईल. काही जागांच्या अदलाबदलीबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. त्याविषयी लवकरच निर्णय होईल”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आघाडीच्या जागा वाटपाचा मसुदा अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा-शिवसेना युतीत यात्रांची लगबग दिसून येत आहे. युतीत जागांची चर्चा सुरू असली तरी गेल्या काही महिन्यात दोन्ही पक्षात बाहेरून येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा युतीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.