निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी तिढ्याचं मुख्य कारण आहे. आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

आणखी वाचा- मुख्यमंत्रिपदात शिवसेनेनं वाटा मागणं हेच तिढ्याचं मुख्य कारण : मुनगंटीवार

राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?; जाणून घ्या महाराष्ट्रात कधी कधी लागू झाली

आम्ही सध्या एकत्र हा तिढा कसा सोडवता येईल याचा विचार करत आहोत. गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नाही. राज्यात महायुतीचंच सरकार यावं अशी त्यांची इच्छा आहे. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी हीच तिढ्याचं मुख्य कारण आहे. देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखं असल्याचं ते म्हणाले. सध्या राज्यपातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आवश्यकता असल्यास राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच येत्या आठवड्यात नवं सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.