लातूरमधील विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्याविरोधात चांगला उमेदवार नसल्याने भाजपाने काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील यांना उतरवण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांची मनधरणीही केली. मात्र, चाकूरकर यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले आहे. “मरेपर्यंत मी आणि कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही,” असं चाकूरकर म्हणाले.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने लातूर शहर मतदारसंघात लक्ष्य केंद्रीत केले आहे. चांगला उमेदवार पक्षाकडे नसल्याने भाजपाने माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी भाजपाकडून गेल्या काही दिवसापासून चाकूरकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, चाकूरकर यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे.

यासंदर्भात शिवराज पाटील यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,”काँग्रेसची विचारधारा हाच आपला श्वास आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य आपल्या हयातीत इतर पक्षात जाणार नाही. पक्षनिष्ठा आणि विचारनिष्ठा आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिल. आयुष्याच्या शेवटपर्यंत कुटुंबातील कुणीही काँग्रेस सोडणार नाही,” असं ते म्हणाले. शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या उपस्थितीत लातूर शहर, ग्रामीण आणि औसा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आज (३ आक्टोबर) अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी चाकूरकर बुधवारीच लातूरमध्ये दाखल आहेत.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील-चाकूरकर या दोन्ही नेत्यांमध्ये काही सुप्त मतमेद असले, तरी त्यांनी पक्षाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले होते. त्यामुळे अर्चना पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याला चाकूरकर विरोध करतील अशीच चर्चा सुरू होती.