राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास याबाबत आम्ही हायकमांडशी चर्चा करु, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसही राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे.

चव्हाण म्हणाले, जर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये परस्पर विश्वासच राहिला नसेल तर ते सरकार कसे बनवू शकतील? त्यामुळे त्यांनी राज्यातील मतदारांना सांगावे की, त्यांच्यामध्ये नक्की काय बोलणी झाली होती.

तसेच जर शिवसेनेने आमच्याकडे सत्तास्थापनेबाबत प्रस्ताव दिला तर आम्ही तो आमच्या हायकमांडच्या समोर ठेवू तसेच आघाडीतील पक्षांसोबत यावर चर्चा करु. मात्र, अद्याप शिवसेनेकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असेही यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले.