दयानंद लिपारे

प्रलयकारी महापुराच्या आपत्तीत बुडालेला कोल्हापूर जिल्हा महिनाभरानंतर सावरला असून आता तो विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुंतला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे प्रश्न प्रचारात चवीने चघळले जात असताना त्यात महापुराच्या आपत्तीला अग्रस्थान मिळत आहे. नदीकाठच्या किमान सात मतदारसंघांत महापुराचे परिणाम निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. महापूर ओसरल्यानंतर मंत्र्यांनी भरमसाठ आश्वासने दिली असली तरी त्याच्या पूर्ततेमध्ये प्रशासनाच्या लालफितीचा अडसर आहे. त्यामुळे पूरग्रस्त पुढील मदतीपासून वंचित आहे. पूरग्रस्तांची नाराजी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला भोवण्याची चिन्हे आहेत.

ऑगस्टमद्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ाला अतिवृष्टी आणि महापुराने तडाखा दिला.  मदयकार्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू झाले. महसूल विभागाने तातडीने रोखीची मदत देऊ केली. पाठोपाठ कृषी, आरोग्य, वस्त्रोद्योग, महिला बालकल्याण, ग्रामीण विकास  मंत्र्यांनीही भरगोस मदतीचे आश्वासन देतानाच सरकार पूरग्रस्त्रांच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. आता पूर आल्यास दोन महिने उलटले असले तरी  मदती कुठे आहे, असा प्रश्न पूरग्रस्तांना पडला आहे.  सत्ताधारी निवडणुकीच्या घाईत आणि विरोधकही याच कामात अडकले आहेत. पूरग्रस्त मात्र आपल्या दुखण्यावर फुंकर घालीत बसला आहे.

प्रचारात पूरप्रश्न

कोल्हापूर जिल्ह्य़ात पंचगंगा (करवीर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी), कृष्णा (शिरोळ), वारणा (पन्हाळा) दूधगंगा (राधानगरी), ताम्रपर्णी (चंदगड) अशा सात मतदारसंघात महापुराची भीषण तीव्रता होती. या मतदारसंघात गटतट, जातीपाती, स्थानिक प्रश्न, उमेदवारांचे कार्य याबरोबर महापुराचा प्रश्न अग्रस्थानी आहे. अनेक गावात प्रचारसभा होत असताना पूरग्रस्तांच्या मदतीचे काय झाले अशी विचारणा होत आहे. याच मुद्दावर पूरग्रस्तांच्या भावना समजून घेताना संमिश्र मतांतरे दिसत आहेत. सत्ताधारी आणि शासन यंत्रणेने काम चांगले केले असून काहीशा विलंबाने का होईना मदत मिळेल, असा आशावादही दिसून येत आहे.

सावरण्यास आणखी दोन महिने

शिरोळ तालुक्यातील श्री नृसिंहवाडी येथे येथील २०० दुकाने पुरात पुरती बुडाली. येथील विक्रेते अजूनही सावरले नाहीत. दत्त व्यापारी असोशिएशन, नृसिंहवाडी या संघटनेचे अधक्ष अनंत धनवडे यांनी ‘दुकानांचे पंचनामे होऊन दोन महिने झाले पण व्यापाऱ्यांना कसलीही मदत मिळाली नाही. तातडीने ५० हजार रुपये देण्याची घोषणा कृष्णेत बुडाली आहे. आम्हाला सावरण्यासाठी आणखी दोन महिने लागतील’, अशा शब्दांत सरकारवर नाराजी व्यक्त केली.

सत्ताधाऱ्यांचे काम योग्यच

ताम्रपर्णीच्या काठची कोवाडची बाजारपेठ चंदगड तालुक्यातील सर्वात मोठी आहे. ती आठ दिवस पाण्यात होती. येथील व्यापारी दयानंद सलाम यांनी ‘सरकारी यंत्रणा नुकसानीच्या कागदपत्राची छाननी करीत आहे, मात्र भाजपने ५२ लाखांची तातडीची मदत दिली’ असे सांगितले. वारणाकाठचे शेतकरी हंबीरराव पाटील म्हणाले, ‘पंचनामे झाले आहेत.  भरपाई देण्याचे काम सुरू असल्याने सत्ताधारी योग्य काम करीत असल्याचे प्रमाणपत्र दिले.

शेतकरी, उद्योजक नाराज : महापुराच्या फटक्यात वस्त्रनगरी इचलकरंजी शहराचे सुमारे १२५ कोटींचे नुकसान झाले. यंत्रमागधारकांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. ‘अद्याप कवडीचीही मदत मिळाली नाही,’ अशी खंत बरगे मळा भागातील यंत्रमागधारक सुरेश तोडकर यांनी व्यक्त केली. ‘आधीच मंदी त्यात महापुराचा तडाखा; यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कारखाने सुरू करण्यासाठी, दुरुस्तीसाठी पैसे मिळवणे कठीण होत असताना दिवाळीला कामगारांचा बोनस कसा द्ययचा याची विवंचना सतावत आहे. या साऱ्या प्रकारामुळे वैतागलेला यंत्रमागधारक शासनाच्या विरोधात उघडपणे बोलत आहे,’ असे त्यांनी सांगितले. संकटकाळात पुरेशी मदत मिळाल्यानंतर आता इतरांना मदत साहित्य पाठवावे असा वेगळा आदर्श करवीर तालुक्यातील आरे गावाने दिला. येथील जयदीप मोहिते म्हणाले, ‘सुरुवातीला रोखीने दिलेले ५ हजार रुपये मिळाले. नंतर बँक खात्यावर तेवढीच रक्कम जमा केली जाणार होती, ती अजूनही अनेकांना मिळाली नाही. शेती, घरांची पडझड  झालेले लोकही मदतीपासून वंचित आहेत. परिणामी या वर्गाची नाराजी सत्ताधारी पक्षांना भोवण्याची शक्यत आहे,’ असेही ते म्हणाले.