महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदार संघात एमआयएमच्या गडाला सुरुंग लावण्यात शिवसेना यशस्वी ठरताना दिसत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे २०१४ साली एमआयएमच्या तिकीटावर निवडून आलेले वारिस पठाण आपला मतदारसंघ गमावण्याची चिन्ह दिसत आहेत.

२००९ सालापासून भायखळा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र २०१४ साली काँग्रेसचे उमेदवार मधु चव्हाण यांचा पराभव करुन वारिस पठाण यांनी निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी देत या मतदारसंघात मोठं आव्हान निर्माण केलं होतं. काँग्रेसचे मधु चव्हाण आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही भायखळा मतदारसंघात आव्हान उभं केलं होतं. मात्र मतमोजणीत या सर्व उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारल्याचं समोर येतं आहे. ज्यामुळे अखेरच्या फेरीपर्यंत हाच कल कायम राहिल्यास एमआयएमचा गड शिवसेना काबिज करेल अशी परिस्थिती आहे.