भाजपातले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपासून कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याचा समाचार शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच महाराष्ट्रासाठी गोड बातमी आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या नशिबात एक स्वाभिमानी सरकार येणार आहे तसे भाग्य मराठी जनतेच्या ललाटी लिहिले आहे. ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणाच्यातही नाही असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून गोड बातमीच्या वक्तव्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेण्यात आला आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

राज्यात महायुतीचे सरकार येईल अशी गर्जना चंद्रकांत पाटील वगैरे भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी गोड बातमी मिळेल असा दावा केला आहे. प्रश्न इतकाच आहे की ते सरकार नक्की कधी येईल वर ही महायुतीकी नक्की कुणाची व कशी? हे दादा वगैरे मंडळींनी सांगितलेले नाही. भाजपा महायुतीचा विचार करत आहे. जी आकाराने मोठी असली तरीही त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा आमदाराही निवडून आलेला नाही. हे सर्व बिन आमदारांचे महामंडळ राज्यपालांना भेटले आणि त्यांनी सरकार स्थापनेबाबत चिंता व्यक्त केली. ही राज्याची चिंता नसून पुढील सरकारात आपले स्थान काय, याची चिंता जास्त आहे.

भाजपाचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोड बातमीचे दाखले दिले आहेत. आता गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कुणाचे लग्न वगैरे ठरले आहे? त्यासाठी लाडवाची की बासुंदीची जेवणावळ देणार आहेत. शेवटी आपल्याकडे गोड बातमीचा संदर्भ लग्न किंवा बारसे याच्याशी जोडला जातो. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरीही पाळणा हलणार का? पाळणा कसा हलेल? हे प्रश्न आहेतच. आता महाराष्ट्राच्या दृष्टीने गोड बातमी एकच अपेक्षित आहे. ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार.

अशा शब्दात सामनातून सुधीर मुनगंटीवार यांच्या गोड बातमी या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. निकाल लागून तेरा दिवस उलटले तरीही सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेने आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. मुख्यमंत्रीपदही अडीच वर्षांसाठी वाटून मागितले आहे. हा पेच कधी सुटणार हे अद्याप सांगता येत नाही. आता सामनातून शिवसेनेने मुनगंटीवार आणि भाजपावर टीका केली आहे.