एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांचा आरोप

औरंगाबाद : आठ जागा देऊन एमआयएमला झुलवत ठेवले जात आहे. असे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना फूस आहे का, अशी शंका येत असल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीमध्ये व्यक्त केली. अ‍ॅड्.असदोद्दीन ओवेसी व खासदार जलील यांच्यामध्ये समन्वय नसल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीने केल्यानंतर त्याला प्रतिउत्तर देत मला जाणीवपूर्वक खलनायक ठरविण्याची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याचे मत खासदार जलील यांनी व्यक्त केले.

पूर्वी बोलणी करताना ९८ जागांचा प्रस्ताव दिला होता. तो कमी करण्यास सांगितल्यानंतर ७४ जागांची यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सादर करण्यात आली होती. त्यानंतर ओवेसी आणि आंबेडकर यांच्यामध्ये बैठकाही झाल्या. मात्र जागांबाबत तोडगा निघाला नाही. वंचितचे प्रवक्ते पत्रक काढून एमआयएमला केवळ १७ जागा मिळाल्याचे सांगत आहेत. ही माहिती दिशाभूल करणारी असून सध्या वातावरण चांगले असल्याने योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी विनंती करत असल्याचे जलील यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा माझ्यावर का राग आहे, हे कळत नाही, असेही जलील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. ओवेसी यांनी सांगितले तर पदाचा त्याग करण्याचीही तयारी असल्याचे जलील म्हणाले. मात्र, जागा वाटपाच्या प्रक्रियेत मला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. खरे तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी एकत्र येऊन काम करावे अशी माझी कल्पना होती. त्यांनी एकत्र काम करावे यासाठी आपण ओवेसी यांना गळ घातली होती. पण आता मलाच खलनायक ठरविले जात आहे, हे चुकीचे आहे, असेही जलील म्हणाले.