शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

वर्धा : मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर आज गुन्हेगारीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. एवढी मोठी नाचक्की नागपूरची कधीच झाली नव्हती, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  केला. हिंगणघाटचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजू तिमांडे यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका केली.

पवार म्हणाले, छत्रपतींनी आपल्या आदर्श कारभाराने एक उत्तम राज्यव्यवस्था राज्याला दिली होती. परंतु आज त्याचे पदोपदी उल्लंघन होत आहे. स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. नागपूर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे नागपूरसह विदर्भात गुन्हेगारांचे साम्राज्य वाढत आहे. आजवर अशी नाचक्की कधीच झाली नव्हती.

महाराष्ट्रातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु त्याविषयी कोणतीही उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. मात्र, विरोधकांना संपवण्यासाठी खोटे गुन्ह्य़ांत अडकवण्याचे काम हे सरकार करीत आहे. मी राज्य बँकेचा सभासद किंवा संचालक नसतानाही माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला. निवडणुकीच्या तोंडावर मला फरार म्हणून दाखवण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप पवार यांनी केला.

सत्तेचा गैरवापर राज्यकर्त्यांकडून सुरू आहे, परंतु या दडपशाहीला मी भीक घालणार नाही. या देशातील ७० टक्के लोक शेती करतात. ही शेती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार राबत आहे. मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करीत मोठमोठय़ा इमारती उभ्या केल्या जात आहेत. हेच षडयंत्र हिंगणघाटसारख्या लहान गावातही सुरू आहे, अशी टीका पवार यांनी केली.

बेरोजगारांना काम नाही. तरुण पिढीवर कामासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणारे सरकार उद्योगपतींचे वेठबिगार झाले आहे. उद्योगपतींचे कोटय़वधींचे कर्ज माफ  तर शेतकरी देशोधडीला असे भीषण चित्र आहे, असे पवार म्हणाले. याप्रसंगी उमेदवार राजू तिमांडे, प्रकाश गजभिये, दिवाकर गमे, संतोष तिमांडे यांची भाषणे झाली.

खड्डेयुक्त रस्ते ही राज्याची नवी ओळख!

खड्डेयुक्त रस्ते ही महाराष्ट्राची नवी ओळख आहे. ही स्थिती बदलण्याची नितांत गरज आहे. कारखानदारी नव्याने सुरू करतानाच शेतीला नवी उभारी देण्याची गरज आहे. यांना धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीला पुन्हा एकदा सत्तेवर बसवा, असे आवाहनही पवार यांनी केले.