01 June 2020

News Flash

मतदारसंघ आणि पक्ष बदलल्यावर तरी नाईक यांना आमदारकी मिळणार का?

बेलापूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

(संग्रहित छायाचित्र)

विकास महाडिक

पुत्रहट्टापायी भाजपमध्ये प्रवेश केला, पण पक्षाने उमेदवारीच नाकारली. आमदारकीचा मोह आवरेना. अखेर मुलाऐवजी मतदारसंघ बदलून रिंगणात उतरलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे. यातूनच त्यांना सावध भूमिका घ्यावी लागली. त्यांच्या विरोधात माथाडी कामगारांचा नेता रिंगणात असल्याने  त्यांच्यासमोर आव्हान आहे.

बेलापूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाईक यांच्या बेलापूर आणि त्यांचे आमदारपुत्र संदीप यांच्या ऐरोली मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळाल्याने नाईक यांच्या गोटात चिंता पसरली. आमदार पुत्राने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा हट्ट धरला. शेवटी गणेशदादांचाही नाइलाज झाला. भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी मुंबईत आले. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी ही त्यांची मागणी होती. पण पक्षाने आमदारपुत्र संदीप यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. येथेच गणेश नाईक यांचे राजकीय चित्र बिघडले.

आमदारकीचा मोह आवरेना आणि भाजपने उमेदवारी नाकारलेली. मग पुत्र संदीप यांनी माघार घेतली आणि गणेश नाईक ऐरोलीतून रिंगणात उतरले.

काँग्रेसची अवस्था बिकट आहे. युती असल्याने शिवसेनाही बरोबर आहे. परिणामी नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांतील लढती कागदोपत्री एकतर्फी वाटत असल्या तरी नाईक सावध झाले आहेत.

माथाडींची मते निर्णायक

ऐरोली मतदारसंघात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय आहे आणि राष्ट्रवादीच्या वतीने गणेश शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते रिंगणात आहेत. काही वर्षांपूर्वी ऐरोली मतदारसंघातच स्थानिक विरुद्ध माथाडी अशी दंगल उसळली होती. त्याच्या खुणा अद्यापही कायम आहेत. माथाडी कामगारांमध्ये शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. तसेच शिवसेनेची मंडळी जुने हिशेब चुकते करण्याची संधी सोडणार नाही. यामुळेच नाईक यांना जास्त सावध भूमिका घ्यावी लागली.

राष्ट्रवादीचा संघर्ष

बेलापूर मतदारसंघात वरकरणी तरी एकतर्फी लढतीचे चित्र आहे.  मंदा म्हात्रे य्यांच्या विरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने यांनी उमेदवारी मागे घेतल्याने म्हात्रे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर अशोक गावडे व म्हात्रे यांच्यात लढत होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील मतदार गावडे यांच्या मागे उभे राहिल्यास त्याचा गावडे यांना फायदा होऊ शकतो. या ठिकाणीही मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे  आपले नशीब आजमावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:17 am

Web Title: naik get mlas even after constituencies and parties change abn 97
Next Stories
1 प्रचाराची आज सांगता
2 नवी मुंबईच्या प्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश
3 कोल्हापुरी आकाशकंदील बाजारात
Just Now!
X