मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा युतीची घोषणा केली. मात्र ही युती दोन्ही पक्षातील काही बंडखोर नेत्यांनी नाकारली आहे. याला कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी त्यांच्याच पक्षातील नितेश राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “नारायण राणे म्हणजे पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र आहे,”असं म्हटलं आहे.
कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून भाजपामध्येही दोन गट पडले आहेत. दरम्यान, संदेश पारकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंवर टीका केली आहे. नारायण राणे हे पुत्रप्रेमात आंधळा झालेला ‘धृतराष्ट्र’ आहे, असे म्हटले आहे. तर निलेश आणि नितेश राणे यांना दुर्योधन-दुःशासन या बंधूंची उपमा दिली आहे.

संदेश पारकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फेसबुकवर एका लेखातून राणे कुटुंबियांना लक्ष्य केलं आहे. या लेखात त्यांनी आमदार वैभव नाईक यांचे काका श्रीधर नाईक यांच्या हत्येपासून सत्यविजय भिसे खून, रमेश गोवेकर बेपत्ता, अंकुश राणेंची हत्या यांसारखी प्रकरणांचा उल्लेख केला आहे. तसेच संदीप सावंत या राणेंच्या पदाधिकाऱ्याला जाळून मारल्याच्या प्रकरणाविषयी त्यांनी लिहिले आहे.

सतीश सावंत कधीकाळी नारायण राणे यांचे विशेष सहकारी म्हणून ओळखले जायचे. परंतु आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, नितेश राणे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे नितेश राणे भाजपातर्फे निवडणूक लढवणार आहेत. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी नितेश यांना हरवण्यासाठी संदीप सावंत यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.