नवाब मलिक यांचा फडणवीस यांना सवाल

मुंबई : संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर भारतात आणले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये भाजप सहभागी होता, ते काश्मीर कोणत्या देशात होते, ते सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ३७० अनुच्छेदावरून भाजप जनतेची दिशाभूल करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

नाशिक येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी ३७० अनुच्छेद रद्द करून काश्मीर भारतात आणल्याबद्दल मोदींचे अभिनंदन केले. काश्मीरमध्ये पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकला, असे वक्तव्यही त्यांनी केले; परंतु काश्मीर भारतातच होते व आहे आणि तेथे दोन ध्वज असले तरी एक ध्वज भारताचा होता व आहे, असे मलिक म्हणाले. मात्र १९९७ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा कधी फडकावला गेला नाही. आम्ही त्याबाबत आंदोलन केल्यानंतर संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकू लागला, याची आठवणही त्यांनी करून दिली. संघाच्या मुख्यालयावर भारताचा तिरंगा ध्वज का फडकावला जात नव्हता याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी नागा करार केला. त्यात त्यांनी  नागालँडच्या वेगळ्या झेंडय़ाला मान्यता का दिली, अशी विचारणा मलिक यांनी केली.

आमचा राष्ट्रवाद असली आहे. आमच्या पक्षाचे नावच राष्ट्रवादी आहे; परंतु भाजपचा राष्ट्रवाद नकली आहे, अशी टीका त्यांनी केली.