मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने नव्या चर्चांनी मोठ्याप्रमाणावर जोर धरला आहे. या भेटीत मंत्रीपदं वाटपाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. काल दिवसभरातील अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रिया आणि रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट पाहता, आता त्यांच्या घरवापसीची शक्यता जवळपास मावळल्यात जमा आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांसह नेते व कार्यकर्त्यांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. तर या भेटीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा सर्व प्रकरा हास्यस्पद असल्याचे म्हटले आहे, शिवाय त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या भेटीची एकप्रकारे खिल्ली उडवल्याचे दिसून आले.

”उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढं मोठं हे मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे त्या दोघांशिवाय एकमेकांना भेटायला त्यांच्याकडे कुणीच नाही, म्हणून ते दोघच एकमेकांना भेटणार. त्यामुळे त्या दोघांनी काय चर्चा केली, हे बाहेर माहिती नाही. परंतु आमदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी खातेवाटपाची चर्चा असं दाखवलं जातं आहे. तुम्ही दोघंच आहात, अद्याप मंत्री केलेले नाहीत, तर खातं कुणाला वाटणार? त्यामुळे हा सर्व प्रकार हास्यस्पद सुरू आहे. रात्री तयार झालेलं सरकार हे रात्रीच कधीतरी जाईल. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.” असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची चिन्ह असताना अचानक शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. याविरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिका सादर केली. यावर काल सुनावणी देखील झाली व आजही याबाबत सुनावणी होणार आहे.