राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केली होती. मात्र, राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचानंतर ही घोषणा चेष्टेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर यावर अनेक विनोद, मीम्स आणि टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. राज्याच्या राजकारणात ‘मी पु्न्हा येईन’ या शब्दांनी खरंच सर्वांना वेड करुन सोडलं आहे. त्यामुळेच की काय रविवारी राष्ट्रवादीच्या पुण्यात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कोअर कमिटीतील सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मोबाईलवर ‘मी पुन्हा येईन यावर अनेक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले. आव्हाडांनी हा विषय छेडल्यानंतर त्यावर छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. विविध प्रकारे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चर्चा करताना बैठकीत चांगलाच हशा पिकला होता.
Video : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही ‘मी पुन्हा येईन’वर चर्चा! pic.twitter.com/jhBhF2vKAO
— LoksattaLive (@LoksattaLive) November 17, 2019
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी पुण्यात कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.