संजय बापट

ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे दुश्मन नाहीत किंवा त्यांच्याशी आमचे बांधावरचे भांडणही नाही. आम्हाला त्यांचा आदरच आहे. मात्र आमचा पक्ष व आमची ताकद वाढविण्यासाठी त्यांच्यावर टीका करणे वा त्यांची कोंडी करणे अपरिहार्य आहे. पवारांची ताकद संपल्यास राज्यात दोन्ही काँग्रेस आपोआप संपुष्टात येतील. या निवडणुकीनंतर पवारांचे राजकीय प्राबल्य आणि काँग्रेसही संपुष्टात येईल, असा दावा करतानाच राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी शिवसेना आणि आमची विचारसरणी जुळणारी असल्याने तसेच कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचा चेहरा  व  पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले चंद्रकांत पाटील हे सध्या विरोधकांचे लक्ष्य झाले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे सारेच पाटील यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. कोथरुडबरोबरच राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये पाटील हे प्रचारात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नामोनिशाण संपविण्याच्या उद्देशानेच पाटील हे रिंगणात उतरले आहेत. भाजप पुन्हा सत्तेत येईल हा ठाम विश्वास व्यक्त करतानाच खास मुलाखतीत शिवसेनेबरोबरील युती, बंडखोरी आदी विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.

* सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्याची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाल्याचा आरोप होतो आहे. याबाबत तुमची भूमिका काय?

आता आरोप करण्याशिवाय विरोधकांकडे कोणतेच काम राहिलेले नाही. या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदही त्यांना मिळणे कठीण दिसते. उलट गेल्या ५० वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत तेवढी या सरकारने पाच वर्षांत केली आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात भरीव कामगिरी करताना गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले सिंचन, मेट्रो, रस्ते प्रकल्प मार्गी लावले. केवळ शहरीच नव्हे तर विशेषत्वाने ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करताना दळणवळण सुविधा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीला सुविधा, कर्जमाफी, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा, मराठा समाजास आरक्षणाच्या माध्यमातून न्याय तसेच अन्य समाज घटकांचेही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात सरकारला यश आले. सरकारच्या कामावर जनता खूश असल्यामुळेच गेल्या पाच वर्षांत झालेल्या जवळपास सर्वच निवडणुका आम्हीजिंकल्यात. राज्यातील जनेतेने आमच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता वाटत नाही.

* पाच वर्षे स्बळाचा नारा दिलात. मात्र आता कार्यकर्त्यांचा विरोध डावलून शिवसेनेशी युती केली. १६४ जागा लढवून राज्यात स्वबळावर सत्ता कशी आणणार?

मुळातच दोन्ही पक्षांची युती हिंदुत्वाच्या एकसमान विचारावर आहे. हिंदुत्व म्हणजे केवळ देवपूजा नाही तर समाजाच्या सर्व घटकांचा सर्वागीण विकास, संस्कृती, आपुलकी, प्रेम, माणसाच्या विकासासाठी काम करणे असे आमचे व्यापक हिंदुत्व आहे. शिवसेना आणि आमच्यात जनहिताचा हा व्यापक पण एकसमान धागा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना दोन्ही काँग्रेसला मिळालेली मते आणि यावेळी त्यांची झालेली आघाडी विचारात घेता कसलाही धोका नको म्हणून युती केली. एवढेच नव्हे तर निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार आल्यावर  घटक पक्षांचा मान- सन्मान कायम राखला जाईल.

* नेत्यांमध्ये युती झाली असली तर कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजूनही दुही दिसते. ५० हून अधिक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. काही ठिकाणी तर बंडखोरांना पक्षाकडूनच रसद पुरविली जात असल्याचा आरोप केला जातो. याबाबत आपली भूमिका काय?

बंडखोरी हे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण आहे. राजकारणात एकाला खूश करताना दुसऱ्यावर अन्याय होतो. जागावाटप असो वा तिकीट वाटप. काहींना न्याय देताना दुसऱ्यांवर अन्याय होतो.  एकाच वेळ सगळ्यांना खूश करता येत नाही. ज्यांची आमदारकीची संधी हुकली अशी मंडळी नाराज आहेत. ते नैसर्गिक आहे. मात्र अनेकांची समजूत काढण्यात आली असून त्यांनी पक्षाचे कामही सुरू केले आहे. मात्र ज्यांनी पक्षाचे आदेश मानले नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असून कालच काही बंडखोरांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपमध्ये कसलीही मनमानी, बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही.

* कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक असल्याने तुमच्यावर बरीच टीका होत आहे. समाज माध्यमांवर तर खिल्ली उडविली जात आहे. कोथरुडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला?

कोल्हापूरमध्ये आमची ताकद वाढली असली तरी युतीच्या सूत्रानुसार दहापैकी आठ जागा शिवसेनेला तर दोनच जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. परिणामी जिल्ह्य़ातून निवडणूक लढविण्यासाठी आपल्याला मतदारसंघच नव्हता. त्यातही आमच्या पक्षात वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला तो मान्य करण्याची परंपरा आहे. मी कोथरूडमधून लढावे हा पक्षाचा निर्णय आहे. शिवाय पुणेकर आणि माझे नाते गेल्या कित्येक वर्षांपासूनचे. विद्यार्थी परिषदेत काम सुरू केल्यापासून म्हणजेच १९८२ पासून सातत्याने पुण्याशी संपर्क असून गेली १० वर्षे पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून याच भागाचे प्रतिनिधित्व करत आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून दोन्ही वेळा विजयी झालो तेव्हा पुणेकरांनीच भरघोस मते दिली होती. आताही केवळ कोथरूडच नव्हे तर संपूर्ण शहर आणि जिल्ह्य़ातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी, या शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करण्यासाठी पुणेकर साथ देतील यात तिळमात्र शंका नाही. आपल्याविरोधात उमेदवारही न सापडल्यामुळे मनसेच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची वेळ दोन्ही काँग्रेसवर आली. मतदारांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असून विरोधकच नवनवीन वाद निर्माण करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र  यात त्यांना कदापि यश येणार नाही.