अजित पवारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशी धनंजय मुंडे बराच वेळ नॉट रिचेबल होते. शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी प्रमुख नेते, आमदार पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी येत असताना धनजंय मुंडेंचा फोन लागत नव्हता. अखेरी दुपारच्या सुमारास धनंजय मुंडे तिथे हजर झाले.

आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६२ आमदारांची ओळख परेड घडवून आणली. त्यावेळी माध्यमांनी धनंजय मुंडे यांना गाठले. “शनिवारी दुपारी मी एक वाजेपर्यंत झोपलेलो होतो. त्यामुळे मला उशिरा झाला” असे त्यांनी सांगितले. “अजित पवारांबद्दलच्या माझ्या भावना हा वेगळा विषय आहे. पण मी पक्षाशी आणि पवारसाहेबांशी एकनिष्ठ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट वैगेर काही नाहीय. आम्ही सर्व एक आहोत” असे धनंजय मुंडे म्हणाले.

“पक्षात असताना मी अजित पवारांसोबत होतो. आता माझा अजित पवारांबरोबर संबंध नाही. अजित पवारांबरोबर संपर्क झालेला नाही. माझ्या बंगल्यावरुन कोणाला फोन गेले याची मला कल्पना नाही” असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. भाजपामधून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात अजित पवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अजित पवारांच्या बंडामध्ये ते त्यांच्यासोबत आहेत असा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना संशय आहे.