विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा काडीमोड झाला. आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला. “वंचितच्या समितीकडून एमआयएमसोबत चर्चा सुरू आहे. एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीविषयी भूमिका मांडली. एमआयएमसोबतच्या युतीवर आंबेडकर म्हणाले, ” मागील काही दिवसांपासून आमच्या दोन्ही पक्षात वाद सुरू असल्याची माध्यमांमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे. पण आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे वाद किंवा निवडणुक लढविण्याबाबत चर्चा करण्याचे दारे बंद करण्यात आली नाही. उलट त्यांच्याकडून दाराला कुलूप लावण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे त्या कुलूपाची चावी आहे,” असं सांगत “एकत्र येण्यास तयार आहोत,” असं आंबेडकर म्हणाले.

“आम्ही सर्व २८८ जागा लढवणार आहोत. आम्ही विरोधीपक्ष होणार हे आता मान्य केलं आहे. पण आम्ही सत्ताधारी होणार आहोत,” असा दावा आंबेडकर यांनी केला. विधानसभा निवडणुक लढवणार का या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, “अनेक वेळा तुम्ही विधानसभा लढविणार का असा प्रश्न सतत विचारला जातो. मात्र मी विधानसभा लढविणार नाही,” असे त्यांनी जाहीर केले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे विधान केले होते. त्या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, “राज्यातील अनेक भागात वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक घटकातील व्यक्ती पक्षात येऊन काम करण्यास तयार आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पक्षाची ताकद वाढली असून, येत्या तीन दिवसात आम्ही २८८ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा-

मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान भीतीपोटी-
“आमचा सामना वंचित बहुजन आघाडीसोबतच आहे. वंचित आघाडी पुढील विरोधी पक्ष आहे,”असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले. “लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित आघाडी विरोधी पक्षात असणार आहे. त्यांचे हे विधान भीतीपोटी केले आहे. आमची ताकद वाढली असल्याचे त्यांनी देखील मान्य केले आहे,” अशी प्रकाश आंबेडकर म्हणाले.