16 September 2019

News Flash

वेध विधानसभेचा : काँग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान

लातूर जिल्ह्य़ात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून, तीन मतदारसंघ भाजप आणि तीन काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

प्रदीप नणंदकर, लातूर

लागोपाठ दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपाने काँग्रेसच्या चारीमुंडय़ा चित केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी हडबडून गेली आहे. भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला जिल्हय़ातील कोणते मतदारसंघ सोडले जाणार, हे अद्याप ठरलेले नाही. नेहमीचेच उमेदवार रिंगणात उतरवणार असतील तर इतरांना संधी कधी मिळणार, या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्ये मात्र एकूणच निराशाजनक सूर असून, इच्छुकांची संख्याही रोडावली आहे.

लातूर जिल्ह्य़ात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून, प्रत्येक तीन मतदारसंघ भाजप आणि काँग्रेसच्या ताब्यात आहेत. लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातूनच भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या तंबूत सामसूमच दिसते.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख सलग दोन वेळा निवडून आले आहेत. आता तिसऱ्यांदा ते रिंगणात उतरतील. २००९च्या तुलनेत गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्यात घट झाली. सामान्य लोकात मिसळत नाहीत, गढीवरून खाली उतरत नाहीत, लोकांसाठी वेळ देत नाहीत असा आक्षेप आहे. असे असले तरी त्यांच्या विरोधात उमेदवार कोण, हे चित्र स्पष्ट होत नाही. हा मतदारसंघ भाजप लढवणार की शिवसेना, याबद्दलही अद्याप स्पष्टता नाही. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, शहर संघटनमंत्री गुरुनाथ मगे, मनपातील भाजप गटनेते अ‍ॅड्. शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक अजित पाटील कव्हेकर अशी इच्छुकांची जंत्री आहे. शिवसेनेचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहेत. वंचित विकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार वेळ नगरसेवक राहिलेले राजा मणियार यांनी प्रवेश घेतला असून मुस्लीम व हिंदू समाजातही त्यांचा चांगला संपर्क आहे. यामुळे तिरंगी निवडणुकीत रंगत येणार आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे, विलासरावांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार दिलीपराव देशमुख यांची नावे चच्रेत आहेत. काँग्रेस नवे नेतृत्व रुजू देत नाही त्यामुळे नवा उमेदवार काँग्रेस रिंगणात उतरवेल अशी चर्चा आहे तर भाजपाकडून रमेश कराड तिसऱ्यांदा आपले नशीब अजमावणार आहेत.

औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व या मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार बसवराज पाटील मुरूमकर तिसऱ्यांदा रिंगणात उतरतील. त्यांच्या विरोधातील पारंपरिक जागा शिवसेनेची आहे. माजी आमदार दिनकर माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी हे दोघे तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक अभिमन्यू पवार हे या मतदारसंघावर लक्ष ठेवून थेट प्रश्नाला भिडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना हिरवा कंदील दाखवल्याने ही जागा भाजपला सुटली तर ते भाजपाकडून रिंगणात उतरतील. वंचित विकास आघाडी, मराठा महासंघ आदीचे उमेदवारही आपले नशीब अजमावतील. बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला मिळेल, याची चर्चा सध्या रंगते आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे पुन्हा एकदा रिंगणात उतरतील. शिवसेनेतून अभय साळुंके यांनी देशमुखांच्या अभयावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरीही काँग्रेसची उमेदवारी पुन्हा एकदा अशोक पाटील निलंगेकरांनाच मिळेल त्यामुळे काका-पुतण्याची लढाई या मतदारसंघात नव्याने होईल. वंचित विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरिवद भातांब्रे निवडणूक रिंगणात उतरले तर लिंगायत समाजाची मते ते घेतील असा कयास बांधला जातो आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघातून आमदार सुधाकर भालेराव तिसऱ्यांदा आपले नशीब अजमावतील. २००९ मध्ये मराठवाडय़ातून पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघेजणच भाजपातून निवडून आले होते. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे त्याचबरोबर पक्षांतर्गत नाराजीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे लागोपाठ दुसऱ्यांदा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जळकोट, उदगीर दोन्ही तालुक्यांत भाजपचे संघटनात्मक जाळे आहे. त्याचा वापर कसा होतो यावर निवडणूक निकालाचे आडाखे आहेत. शिवाय वंचित विकास आघाडीचा उमेदवार किती मते घेतो यावरही पारडे कोणाकडे झुकणार, हे ठरणार आहे.

सर्वाधिक चच्रेत असलेला मतदारसंघ हा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार विनायकराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील व भाजपचे गणेश हाके यांचा पराभव केला होता. आता पाटील भाजपात आलेले आहेत व त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा बाबासाहेब पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्हा पक्षीय बलाबल

* लातूर शहर – काँगेस

* लातूर ग्रामीण – काँगेस

* औसा – काँग्रेस

* निलंगा – भाजप

* उदगीर – भाजप

* अहमदपूर – भाजप

लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली आहे. नरेंद्र मोदींप्रमाणेच राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सक्षम नेतृत्व आहे. जिल्हय़ातील ग्रामपंचायतीपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा निवडणुकीत सहाही जागा भाजप-सेना ताब्यात घेतील. मतदारसंघ कोणाला जाणार हा विषय गौण राहणार आहे.

 – नागनाथ निडवदे, जिल्हाध्यक्ष भाजप

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या सर्व मतदारसंघांत भाजपाला आघाडी मिळाली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागा काँग्रेसने आपल्या ताब्यात मिळवल्या. या वेळी राज्य सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी आहे. दुष्काळ, बेरोजगारी, उजनीचे पाणी असे अनेक प्रश्न हाताळता आले नाहीत. सहापैकी चार जागा आघाडी नक्कीच जिंकेल.

– अ‍ॅड्. व्यंकट बेंद्रे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

First Published on August 1, 2019 1:18 am

Web Title: review of six legislative assembly constituencies in latur district zws 70