ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं, सत्ता मिळवण्यासाठी केवळ महायुती हाच पर्याय असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षात फूट पडल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये भीमसृष्टीच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

“आगामी विधानसभेसाठी आरपीआय पक्षाला दहा जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्राशी बोलणं झालं असून यावर विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची बिघाडी झाली आहे. त्यासंदर्भात काही विचार केला आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं. सत्ता मिळवायची असल्यास महायुती हाच पर्याय आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.

“सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून अनेक जण भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांना माहित आहे की देशात आणि राज्यात केवळ मोदीच सरकार येणार आहे. दुसऱ्या कुठलाही पक्षाची सत्ता येणं अशक्य आहे. महायुती एकत्र आहे. आम्हाला २४० पेक्षा जास्त जागा मिळतील. वंचित बहुजन आघाडीची अजिबात चिंता नाही,” असं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.