निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतच बिघाडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा इरादा फसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी दिल्ली तसेच राज्यातील आमदार ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेस त्या जयपूरमधून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक विचार केला जात होता. मात्र सायंकाळी सहा वाजता शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची फोनवर चर्चा झाल्यानंतर पाठिंबा देण्याचा विचार बारगळ्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते जयपूर आणि दिल्लीमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे प्रभारी बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेतेही बैठकीसाठी उपस्थित होते. या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व काँग्रेस नेत्यांनी पवारांच्या एका फोन कॉलमुळे ‘वारं फिरलं’ असं मत नोंदवल्याचे ‘इंडिया टुडे’नं म्हटलं आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पवार आणि सोनिया यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. याआधीच सोनिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पाठिंब्यावरुन चर्चा केली होती. त्यानंतर काय करता येईल यासंदर्भात पवारांचे मत जाणून घेण्यासाठी पवार आणि सोनियायांचे फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली तेव्हा त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, केसी वेणूगोपाल, ए.के. अ‍ॅण्टनी आणि मल्लिकार्जून खर्गेही उपस्थित होते.

नक्की वाचा >> #LoksattaPoll: शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला ‘बहुमत’

फोनवरुन झालेल्या चर्चेमध्ये पवारांनी सध्याच्या घडीला काहीच चित्र स्पष्ट होत नसल्याचे सोनियांना सांगितले. तसेच मला उद्धव ठाकरे यांच्याकडूनही सत्तास्थापनेसंदर्भात काहीच माहिती मिळालेली नाही असंही पवारांनी सोनियांना सांगितले. मी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करुनच तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो असं पवारांनी सोनियांना सांगितल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा न मिळण्यामागे ‘या’ तीन दाक्षिणात्य नेत्यांचा ‘हात’

या चर्चेनंतर सोनिया यांनी पवारांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिली. जवळजवळ सर्वच नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा सल्ला सोनिया यांना दिला होता. पवारांनी वाट पाहण्याचा सल्ला दिल्याचे सोनिया यांनी नेत्यांना सांगितल्याचे समजते. काँग्रेसच्या नेत्यांनी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांनी शेवटच्या क्षणी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरुन यू-टर्न घेतला. दिवसभरामध्ये पवारांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करुन त्यांना काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी वरिष्ठांना राजी करावे अशी गळ घातल्याचे समजते. मात्र दिल्लीमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विरोधामध्ये होते. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास राज्यामध्ये पक्षाला फायदा होऊ शकतो असं राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. वैचारिक मतभेद असल्याने शिवसेनेला थेट पाठिंबा देण्यास दिल्लीचा विरोध होता.