राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरूवात झाली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा  मतदारसंघाताली दहीटने गावात  मतदान प्रक्रियेदरम्यान हाणामारीची घटना घडल्याचे समोर आली आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.

मारहाण झालेला नारायण पाटील यांचा कार्यकर्त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर परिसरात कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

करमाळा मतदारसंघातून शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे तर विद्यमान शिवसेनेचे आमदार अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या अगोदर अमरावती जिल्ह्यातला मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी , ‘देवेंद्र भुयार यांना सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक फिरायला निघाले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळाकडे भुयार यांना वाचवण्यासाठी धाव घेतली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली.’ अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.