मंगळवारी संध्याकाळी द रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतच जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा केला. मात्र त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी “नारायण राणे यांचं सरकार स्थापनेविषयीचं मत त्यांचं व्यक्तिगत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही,” असं स्पष्ट केलं आहे.

भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेची जबाबदारी राणेंच्या खांद्यावर देण्याचा कोणाताही निर्णय झाला नाही असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. “नारायण राणेंनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यातील काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादर केला. राज्यातील शेतकरी संकटात असून अनेक समस्या असताना जनादेशाच्या अनादर करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

मनुगंटीवार यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. “राज्यातील काही पक्षांनी जनादेशाचा अनादर केला आहे. राज्यामध्ये शोषित तसेच शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत. अशा पस्थितीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. २४ नोव्हेंबर रोजी निकाल काय आहे हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर राज्यात सरकार लवकरात लवकर स्थापन होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, भाजपला राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर जनादेश भाजपाच्या बाजूने असतानाही तसं करता आलं नाही. भाजपाने इतर पर्याय शोधले नाही. मात्र आमच्या मित्रपक्षाने इतर पर्याय शोधले”, असं मुनगंटीवार म्हणाले. “राज्यामध्ये कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. कोणालाही राज्यपालांसमोर दुसऱ्या पक्षाच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. इतरांचा पाठिंबा असल्याचं सांगणाऱ्यांना असा पाठिंबा राज्यपालांना दाखवता आला नाही. त्यानंतर त्यांनी आम्ही राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी आम्हालाही वेळ वाढवून दिला नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयातील याचिका दाखल केली. मात्र हे असं करण अप्रस्तुत आहे,” असंही मुनगंटीवार म्हणाले.

काय म्हणाले होते राणे

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणेंनी “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नीती अजूनही उद्धव ठाकरेंना कळली नाही का? हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. जेव्हा भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा १४५ आमदारांची यादी हातात घेऊन जाईल आणि सत्ता स्थापन करेल रिकाम्या हाती आम्ही जाणार नाही,” असा विश्वास राणेंनी व्यक्त केला होता.