मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यांत, सीमावर्ती जिल्ह्य़ांत असलेल्या विविध भाषिक मतदारांच्या मनात भाजपबद्दल आपुलकी निर्माण करण्यासाठी इतर राज्यांतीलखासदार-नेत्यांचे जवळपास ६० प्रवासी कार्यकर्ता हा उपक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत फिरण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

मुंबई भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती या मुख्यालयात भूपेंद्र यादव यांच्यासह ज्येष्ठ केंद्रीय नेत्यांनी आणि प्रदेश, मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांची व या प्रवासी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. इतर राज्यांतील खासदारांचाही यात समावेश होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत कशा रीतीने पक्षासाठी काम करायचे यावर चर्चा झाली. राज्याच्या कोणकोणत्या भागांत कोणत्या राज्यातील- भाषिक गटाची माणसे आहेत, याचा अभ्यास करून प्रवासी कार्यकर्त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईत देशभरातील सर्व राज्यांतील विविध भाषिक गट राहतात. आपल्या राज्यातील माणूस, आपली भाषा बोलणारा माणूस प्रचारासाठी आला की मतदारांना बरे वाटते. मतदारांची ही भावना लक्षात घेऊन मुंबईसह राज्यातील विविध भागांत हिंदी भाषिक, तेलुगू भाषिक, गुजराती, पंजाबी अशा विविध भाषिक गटांशी संवाद साधण्यात येणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या शेजारच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर- लोकप्रतिनिधींवर जबाबदारी टाकण्यात येत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी  नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी मुंबईत वसंतस्मृती येथे मुंबई भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी घेतली. यात नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आमदार, खासदार आदी उपस्थित होते.