सरकारस्थापनेबाबत लवकरच गोड बातमी मिळेल, पेढ्यांची ऑर्डर गेलीय असं समजा अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनाप्रणित सरकारस्थापनेबाबत विश्वास व्यक्त केला. दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

राऊत म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट दूर होऊन लवकरच लोकप्रिय सरकार स्थापन होईल, सर्व घडामोडींवर शिवसेनेची नजर असून सरकार स्थापनेबाबतची गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देऊ शकले नाहीत मात्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच गोड बातमी देतील.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील मॅरेथॉन चर्चेनंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी चर्चा अंतिम टप्प्यात असून उद्यापर्यंत चर्चा सुरुच राहिल असे पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी पुन्हा माध्यमांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मात्र, या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून येत्या २ ते ५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन होईल.

आघाडीची बैठक पुढील चार-पाच तास सुरु राहील. पण आता ही प्रक्रिया जास्त काळ लांबणार नाही. राज्याच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही काँग्रेसला सांगितलंय. त्यामुळे शिवतीर्थावर जेव्हा शपथविधी होईल तेव्हा नव्या मुख्यमंत्र्याचे नाव कळेल, असे राऊत म्हणाले.