भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांना विरोध?

राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली असली तरी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात मात्र भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारात अद्यापही शिवसैनिक सक्रिय झालेले नाहीत. शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक केवळ नावापुरतेच भाजपसोबत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे आणि काही ठिकाणी तर शिवसेना मेहता यांच्या विरोधात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी झालेली भाजप आणि शिवसेनेतील युती पुढे विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या उमेदवारासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहनही केले आहे. परंतु मीरा-भाईंदर मतदारसंघात वेगळेच चित्र आहे. भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होतात. मात्र ते केवळ दाखवण्यापुरतेच. मेहता यांचा प्रचार करण्यामध्ये शिवसैनिकांना अजिबात रस नसल्याचे दिसून येत आहे.

मतदारांना भाजपला मतदान करा असे न सांगता तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा, असे सांगत असल्याचे एका शिवसैनिकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. काही ठिकाणी तर भाजपच्या बंडखोर गीता जैन यांना शिवसैनिक पाठिंबा देत असून त्यांच्या प्रचाराची धुराही सांभाळत आहेत.

गीता जैन यांनी उमेदवारी अर्ज भरताना काढलेल्या विशाल मिरवणुकीला कार्यकर्त्यांची रसद पुरवण्याचे कामही शिवसेनेकडून करण्यात आले. शिवसेनेचे राजू भोईर आणि कमलेश भोईर हे उघडपणे गीता जैन यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

भाईंदर पूर्व भागात होणाऱ्या नियोजित बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा विषय भाजपने जाणूनबुजून डावलला असल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्याचा राग ते नरेंद्र मेहता यांच्यावर काढत आहेत. सुरुवातीला तर शिवसैनिकांनी नरेंद्र मेहता यांचा प्रचारच न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून प्रचारात सहभागी होण्याचे आदेश मिळाल्यानंतर शिवसैनिक प्रचारात सामील होत आहेत मात्र ते केवळ नेत्यांना दाखविण्यापुरतेच असल्याचे समजते.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या सोबतच आहेत. काहींच्या मनात अजून संभ्रम असेल तर तो दूर करण्यासाठी ११ ऑक्टोबरला भाजप आणि शिवसेना युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. – हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप