भोसरी विधानसभेच्या क्षेत्रात भाजप-शिवसेनेत असलेला वाद जुना आहे. लोकसभा निवडणूक काळात झालेली ओढाताण आणि नंतर मतदार संघ मिळवण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षांमध्ये बराच काथ्याकूट झाला. त्यातच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाजप आमदार महेश लांडगे यांनी दांडी मारली. त्यातून पुन्हा सुरू झालेल्या वादाचे भांडवल करत त्याचा फायदा विरोधी गटाने घेतला. समाजमाध्यमातून विरोधी वातावरण तयार होताच भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना संयुक्त पत्रकार परिषदेत सारवासारव करावी लागली.

पिंपरी पालिका निवडणूक, शिरूर लोकसभा निवडणूक आणि आता भोसरी विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस झाल्याचे दिसून आले आहे. आमदार लांडगे हे उद्धव ठाकरे यांच्या पिंपरीतील सभेला गैरहजर राहिले, त्यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. हे ताज्या वादाला निमित्त ठरले आहे. शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेतली आणि महेश लांडगे यांचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्या लांडे समर्थकांनी पद्धतशीरपणे पसरवल्या.

समाजमाध्यमांमध्ये विरोधी वातावरण तयार झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. मुंबईपर्यंत वार्ता गेल्याने तत्काळ खुलासा करण्याचे आदेश आले. त्यानंतर, महापौर राहुल जाधव, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भाजप नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

महापौर जाधव म्हणाले, दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. उबाळे म्हणाल्या, लांडगे सभेसाठी उशिरा पोहोचले होते. तत्पूर्वी, त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. शिवसेना लांडगे यांच्यासोबतच आहे. मतदार संघ मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आम्ही स्वीकारला आहे. लांडगे यांना मोठय़ा मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.