महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होणं फक्त बाकी राहिलं आहे. मात्र सगळीकडे माहोल निवडणुकीचाच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते. मात्र मोदी आणि शाह यांच्या विरोधातली भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मनसेला आघाडी सोबत घेईल अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून रंगली होती मात्र मनसेला आघाडीने म्हणजेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने सोबत घेतले नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता, “राज ठाकरेंचं आम्हाला नाही तर काँग्रेसला वावडं आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेला सोबत घेण्याची इच्छा होती. पण काँग्रेसला इच्छा नाही त्यामुळे तो विषय सोडून दिला. काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेकाप हे सगळे आमच्यासोबत आहेत ” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्हीएमवरही त्यांची भूमिका मांडली, तसेच मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. “ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी ही मागणी सगळ्याच पक्षांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ऐकूनच घेतलं नाही त्यामुळे तो विषय आता संपला ” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले प्रश्न, ते कसे सोडवले? आणि भविष्यात काय करणार हे सांगत आहेत हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. धनंजय मुंडे यांनी या सरकारमधील 16 मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली, त्याची चौकशी व्हायला हवी होती. मात्र हे सरकार चौकशी कधीच करणार नाही ” असाही आरोप शरद पवार यांनी केला.