औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचा ट्रक ग्रे मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयितांना अटक केली आहे. हा ट्रक विकण्याचा प्रयत्न ट्रक मालकाच्याच प्लॅनचा भाग असल्याची माहिती मिळत आहे. बँकेच्या कर्जाची परतफेड करायला लागू नये यासाठी हा कट केल्याची माहिती हाती लागली आहे.

याविषयी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या ट्रकच्या मालकाला वाहन चोरीला गेल्याचा दावा करून बँकेच्या कर्जाची परतफेड टाळायची होती. विम्याचे पैसे मिळवून ते वाहन सेकंड-हँड ग्रे मार्केटमध्ये विकण्याचा विचार होता, मात्र, पोलिसांमुळे ही योजना उधळली. ट्रक मालक गजानन सिंघलने आणि त्याच्या साथीदारांसोबत एक योजना आखली आणि ट्रक ज्या ठिकाणी उभा होता तेथून हलवला. दोन दिवसांनंतर त्यांनी वाहन चोरीची पोलिस तक्रार दाखल केली. चोरीला गेलेला ट्रक शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रक्रियेत त्यांना योजनेबद्दल माहिती मिळाली. सिंघलने त्याच्या विश्वासपात्राला अमरावतीच्या ग्रे मार्केटमध्ये ट्रक विकण्यासाठी पाठवलं. त्याबद्दलची माहिती पोलिसांनी मिळाली त्यामुळे ते सतर्क झाले.

गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेने सापळा रचून वाहनाचा माग काढला आणि नारायण गावडेकर (२९), अनिल जोनवाल (३१) आणि संजय जंगले (३४) या तिघांना अटक केली.

यापूर्वी याच वर्षी जुलैमध्ये गाझियाबाद पोलिसांनी असाच एक प्रकार उघडकीस आणला होता. ट्रान्सपोर्ट कंपनी चालवण्यासाठी चोरीची वाहने वापरणाऱ्या टोळीचा भाग असलेल्या तीन आरोपींना तपास पथकाने अटक केली.

टोळीने मूळ वापरकर्त्याकडून स्क्रॅप केलेल्या वाहनाचे दस्तऐवज विकत घेतले आणि त्यांनी महामार्गावरून चोरलेल्या ट्रकच्या इंजिनवर चेसिस क्रमांक वापरला.

या टोळीची कारवाई फक्त गाझियाबादपुरती मर्यादित नव्हती आणि या टोळीने देशाच्या विविध भागांमध्ये अशीच चोरीची वाहने विकल्याचा आरोप आहे. भंगार वाहनांच्या कागदपत्रांच्या मदतीने ही टोळी चेकिंग पॉईंट आणि टोल प्लाझा चुकवण्यात यशस्वी झाली. कागदपत्रे मूळ दिसत होती आणि पोलिसांनी शेवटी त्यांची टोळी फोडण्यापूर्वी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कारभारावर कोणालाही शंका नव्हती. अटकेदरम्यान पोलिसांनी असे चार ट्रक जप्त केले आहेत.