मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकप्रश्नी सरकार गंभीर नाही, असा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केला. मराठा आरक्षणप्रश्नी समिती नेमणुकीचा अध्यादेश विधिमंडळ अधिवेशनापूर्वी काढला जावा, अन्यथा सरकारविरोधात येत्या अधिवेशनात हक्कभंग आणावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, रणजीत सावंत व अन्य उपस्थित होते.
राज्यात मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश करून २५ टक्के आरक्षण द्यावे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनास खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून सरकारशी भांडत आलो आहोत असे आम. विनायक मेटे म्हणाले.
या प्रश्नासाठी राज्यभर लोकशाही मार्गाने कायदेशीर आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सकारात्मक पावले टाकली. छत्रपतींच्या स्मारकास तत्त्वत: मान्यता देऊन ५० कोटीचे बजेटही केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मागास आयोगाची स्थापना करून न्यायाधीश बापट यांची नियुक्ती केली असे आम. मेटे म्हणाले.

या आयोगाचे बहुमत असूनही सरकारला आरक्षणाविषयी शिफारस केली नसल्याने न्यायमूर्ती सराफ यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाला पुनर्विचार करण्यास सांगितले. पण सरकारने नेमका कोणता पुनर्विचार करावा हे नमूद केले नसल्याने या आयोगानेही असमर्थता व्यक्त केली.
मराठा आरक्षण आणि छत्रपतीचे स्मारक प्रश्नावर नागपूर अधिवेशनात सर्व आमदारांना घेऊन संघर्ष केला तेव्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्वाची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तीन महिन्यात अहवाल देण्याचे धोरण ठरले असे आम. मेटे म्हणाले.
या मराठा आरक्षण समितीची प्रगती कॅबिनेटमध्ये ठेवण्याचे ठरले, पण दीड महिना उलटला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षण व छत्रपतीच्या स्मारक समिती नियुक्तीबाबत अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे राज्याचे प्रमुख असणाऱ्यांना नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून प्रश्न सोडविण्याचा विचार नसावा असा आरोप अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यावर आज मेटे यांनी केला. सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असी टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. विधिमंडळाची ही फसवणूक असल्याने महाराष्ट्र शांतपणे पाहणार नाही. हे अध्यादेश वेळीच निघाले नाही तर सरकारविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा आम. विनायक मेटे यांनी दिला. मराठा समाजाला राणे यांच्याकडून न्याय मिळेल असे वाटते, पण राज्याच्या प्रमुखांना त्यांच्याकडून प्रश्न सोडविण्याची इच्छा नाही असा आरोप करून राज्यातील गडकिल्ले संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राजस्थानसारखे महामंडळ उभारावे असे आमदार विनायक मेटे म्हणाले.