अगस्ती आश्रम परिसराचा आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचा मनोदय आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगतानाच प्रादेशिक पर्यटन विकास आराखडय़ातून विविध कामांसाठी १ कोटी १३ लाख रुपये उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली.
महाशिवरात्रीनिमित्ताने अगस्ती मंदिरात गुरुवारी पहाटे पिचड व हेमलता पिचड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच राम मंदिर परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. युवानेते वैभव पिचड हेही या वेळी उपस्थित होते.
तालुक्यातील लिंगदेव येथील लिंगेश्वर, कळस येथील कळसेवर, रतनवाडी येथील अमृतेश्वर, कोतूळ येथील कोतुळेवर, रंधा येथील घोरपडादेवी मंदिर आणि निंब्रळ येथील देवीच्या मंदिरासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये तीर्थक्षेत्र योजनेतून दिले असल्याचे पिचड यांनी सांगितले. अगस्ती मंदिर परिसरालाही यापूर्वी २५ लाख रुपये देण्यात आले आहेत. राज्यात आकर्षण ठरेल अशा स्वरूपाचे तीर्थक्षेत्र म्हणून अगस्ती मंदिर परिसराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी प्रास्ताविकात मंदिर परिसराच्या विकासासाठी आजपर्यंत पिचड यांच्या माध्यमातून १ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध असून तेथे तीन दिवसांचा अकोले महोत्सव भरविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल झाल्यानंतर तेथे घाट बांधून तेथपासून मंदिर परिसरापर्यंत हा रस्ता बांधावा अशी मागणी त्यांनी केली. विश्वस्त परबत नाईकवाडी यांनी आभार मानले. दीपकमहाराज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onफंडFund
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 25 crore fund to agasti temple pichad
First published on: 28-02-2014 at 03:10 IST