आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वारक-यांचा दळभार पंढरपुरात दाखल झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या प्रमुख पालख्यांसह शेकडो संतांच्या लहान मोठ्या पालख्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत अवतरल्या आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे.
सायंकाळी संत ज्ञानदेव व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या अलीकडे वाखरी येथे आगमन झाल्यानंतर तेथे अखेरचे गोल रिंगण पार पडले. या वेळी ज्ञानदेव-तुकारामांच्या गजराने वातावरण भारावून गेले. शेकडो किलोमीटर अंतरावरून पायी चालत आलेल्या संतांच्या पालख्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक स्वागत केले. तेथून मुख्यमंत्री फडणवीस काही अंतर पालखी सोहळ्यासोबत चालत पंढरपुरात आले. पालखी सोहळ्यामध्ये सुमारे सहा लाख वारकरी होते. तर पंढरीत एक-दोन दिवस अगोदर चार लाखांपेक्षा वारकरी तथा भाविक दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगांच्या निनादात सतत होणारा हरिनामाचा गजर आणि प्रत्येकाला विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ यामुळे चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळाले.
पंढरीत दाखल झालेल्या वारकरी तथा भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा दहा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या आहेत. दर्शन रांगेत गडबड गोंधळ होऊ नये आणि भाविक वारक-यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधा वाखाणण्याजोग्या आहेत. दर्शन रांगेत वारकरी तथा भाविकांना शुध्द पाण्यासह चहा व नाष्ट्याची सोय पहिल्यांदाच तीसुध्दा अगदी मोफत स्वरूपात करण्यात आल्यामुळे सारेचजण सुखावले आहेत. दर्शन रांगेत एरव्ही मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. परंतु यंदा दर्शन रांगेत आठ फूट उंचीचा कठडा उभारण्यात आल्यामुळे कोणताही गोंधळ दिसत नाही तर सगळीकडे शिस्त जाणवते. दर्शन रांगेची लांबी दहा किमीपर्यंत गेली असताना प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनासाठी बारा ते पंधरा तासांचा कालावधी लागत आहे.
पंढरपुरात वैष्णवांच्या मांदियाळीमुळे चंद्रभागेच्या तिरासह वाळवंट व संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी लाखो भक्त दिसत आहेत. यात्रेच्या काळात चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फटकारे मारत बरेच निबर्ंध लादले आहेत. अखेरच्या क्षणी भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्षांतून वीस दिवस वाळवंट वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायात समाधानाचे वातावरण असताना घातलेल्या र्निबधामुळे धार्मिक कार्यक्रम होताना वाळवंटात कोठेही अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी वाळवंटाचा परिसर स्वच्छ दिसत आहे.
एकीकडे वाळवंटात राहुट्या उभारून निवास करण्यास बंदी असल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाळवंटाला लागूनच काही अंतरावर ६५ एकर शासकीय जागेवर वारक-यांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे. त्याठिकाणी सुमारे एक लाख वारकरी निवाऱ्याचा लाभ घेत आहेत. सर्व मठ, यात्री निवास, धर्मशाळांसह खासगी निवासस्थाने, छोटे मोठे हॉटेल्स, लॉजेस गर्दीने तुडूंब भरले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
पंढरीत दहा लाख वारक-यांचा दळभार
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वारक-यांचा दळभार पंढरपुरात दाखल झाला.

First published on: 27-07-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakh devotees in pandharpur for ashadhi ekadashi yatra occasion