सावंतवाडी: वेंगुर्ला एसटी डेपोमध्ये वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याप्रकरणी एसटी महामंडळाने कठोर कारवाई केली आहे. या घटनेत सामील असलेल्या एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, यात वेंगुर्ला डेपोमधील १० आणि कुडाळ डेपोमधील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीचा ठपका ठेवून एसटीच्या कणकवली विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

ही घटना ६ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आगारात घडली. एका गाडी निरीक्षकाची आणि दुसऱ्या गाडी चालकाची गाडीच्या अदलाबदलीवरून बाचाबाची झाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी त्या निरीक्षकाला शिवीगाळ केली. या घटनेनंतर ‘सेवा शक्ती संघर्ष’ संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, निरीक्षकाला आगाराबाहेर काढल्याशिवाय कोणतीही बस सोडू नये असा निर्णय घेतला. यामुळे दुपारी १:४५ पासून रात्रीपर्यंत नियोजित बस फेऱ्या निघू शकल्या नाहीत किंवा उशिराने धावल्या. याचा परिणाम प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आणि एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाली, असे आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधीक्षकांना दिलेल्या अहवालात म्हटले होते.

या वादामुळे वाहतूक नियंत्रकांना काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, वाहतूक नियंत्रकांनी तक्रार दाखल न केल्याने प्रकरण मिटले. तरीही, आगार व्यवस्थापकांच्या अहवालानुसार, वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक आणि वाहन निरीक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार, दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.