३९ जणांचा मृत्यू, १६० जखमी
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत असून, या मार्गावर वेगाशी सुरू असलेली स्पर्धा अनेक अपघातांना व अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. गेल्या साडेपाच महिन्यात या मार्गावर ११७ अपघातांमध्ये ३९ जण मृत्युमुखी पडले असून १६० जण जखमी झाले आहेत.
सेना-भाजप युतीच्या काळात मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रस्ता मार्गाचे अंतर कमी करुन ही दोन्ही शहरे जोडण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. अतिशय वेगवान मार्ग अशी या मार्गाची ओळख आहे. या महामार्गाला आता सोळा वर्षे झाली असून या मार्गावरुन मार्गक्रमण करणारी वाहने व वाहन चालक अजूनही या मार्गावरील नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत, तसेच घाटक्षेत्रात वाहतूक कोंडीही सातत्याने होत आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग काढण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आहे. त्यात लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज ते खोपोली फुड मॉल दरम्यान भुयारी मार्ग व काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या कामाला शासनाने हिरवा कंदील दाखविला असला तरी हे काम सुरु होण्यास व पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागणार असल्याने आहे त्याच मार्गावरील अपघात व वाहतूक कोंडी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या मार्गावरील बहुतांश अपघात हे अतिवेगामुळे झाल्याचे स्पष्ट झालेले असल्याने या मार्गावर वेग नियंत्रणात ठेवल्यास तसेच मार्गिकेच्या शिस्तीचे पालन करत वाहने चालविल्यास अपघात व वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.
या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. द्रुतगती महामार्गावर गेल्या सहा महिन्यात ११७ अपघात झाले आहेत. यापकी ३२ अपघात हे प्राणांतिक असून यामध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला. मार्गावरील १५ अपघात गंभीर आणि ३५ अपघात किरकोळ स्वरुपाचे असून त्यात १६० जण जखमी झाले. अन्य ३५ अपघातांमध्ये कोणाला दुखापत झाली नाही, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. अपघातांचे हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने या मार्गावरुन प्रवास करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही खंडाळा महामार्ग पोलिसांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 117 accidents on mumbai pune expressway
First published on: 22-05-2016 at 01:21 IST