लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कोणताही घातपात होऊ नये यासाठी सुरक्षा दलांनी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच नक्षलवाद्यांनी मंगळवारी सुरक्षा दलांनाच लक्ष्य केले. छत्तीसगढमधील जिरम घाटात दबा धरून बसलेल्या सुमारे २०० नक्षलवाद्यांनी रस्तेबांधणी कामाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. बस्तर जिल्ह्य़ानजीक ही घटना घडली. विक्रम निशाद हा सामान्य नागरिकही या हल्ल्यात ठार झाला.  
बस्तर विभगातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर अनेक ठिकाणी रस्ताबांधणीची कामे सुरू आहेत. या कामाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलावर सोपवण्यात आली आहे. याच परिसरात जिरम हा पहाडी प्रदेश आहे. जिरम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तकवाडा गावाजवळ दबा धरून बसलेल्या २०० नक्षलींनी सुरक्षादलांवर हल्ला केला. ४० जवानांच्या एका तुकडीचे दोन विभाग करण्यात आले होते. त्यातील पहिल्या तुकडीलाच नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. सकाळी दहापासून सुरू झालेली चकमक दीड तास चालली. त्यात दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र, या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ११ तर जिल्हा पोलीस दलाच्या चार जवानांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात याच परिसरात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला होता. या घटनेनंतर या संपूर्ण पहाडी भागात सुरक्षा दलांची तीन नवीन ठाणी उभारण्यात आली होती. तरीही नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला करून सुरक्षा दलांना हादरा दिला आहे.

पाळत ठेवली..
घटनास्थळापासून सात किमी अंतरावरील टोंगपाल येथे तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या तुकडीचे जवान रोज सकाळी सुरक्षेसाठी जाऊन सायंकाळी परत येत. कामाच्या ठिकाणी येणारे जवान कसे येतात व कसे परत जातात, याची माहिती नक्षलवाद्यांनी मिळवली. जवानांच्या या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलेल्या नक्षलवाद्यांनी योजनाबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणला.

शहिदांची नावे
केंद्रीय राखीव पोलिस दलाचे निरीक्षक टी.आर.सिंग, उपनिरीक्षक सुभाष सिंग, फैजल उलहक, लखबिरसिंग, प्रदीपकुमार, मनोज ब्रेद, निरजकुमार, नहरसिंग, कौशल किशोर व सोमनाथ राठोड, जिल्हा पोलिस दलाचे नकुल ध्रुव, ईशू पिसदा, राजेंद्र गायकवाड व आदित्य साहू.