दंडकारण्यात २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पुकारण्यात आलेल्या नक्षल सप्ताहात प्रथमच १५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलीस दलाला यश आले आहे. सप्ताहाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलासमोर सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवादी चळवळ पूर्णत: खिळखिळी झाली असतानाच आता दर्रेकसा दलमही पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे.
नक्षलवाद्यांनी दंडकारण्यामध्ये २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल सप्ताह पुकारला होता. यापूर्वी नक्षल सप्ताहात भूसुरुंग स्फोट किंवा चकमकीत पोलिसांना किंवा जाळपोळीच्या माध्यमातून वन विभाग, महसूल किंवा परिवहन महामंडळाला लक्ष्य केले जायचे. आदिवासींचे हत्यासत्र राबवले जायचे. मात्र, यावेळी प्रथमच नक्षल सप्ताहात पोलिसांनी दंडकारण्य प्रदेशात १५ नक्षलवाद्यांना ठार केले. २७ जुलै रोजी छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागांतर्गत जगदलपूर जिल्हय़ातील माचकोटी जंगलात चकमकीत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. २९ जुलै रोजी गडचिरोली जिल्हय़ांतर्गत चामोर्शी तालुक्यातील गरंजी पहाडावरील जंगलात नक्षल व सी-६० पथकात चकमक उडाली. यात चार लाखाचे बक्षीस असलेली जहाल नक्षली सुशीला ऊर्फ रूपी महागू नरोटे ठार झाली. ३ ऑगस्ट सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्हय़ात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सीतागोटा व शेरपारच्या जंगलात मोठी चकमक झाली. या चकमकीत ४ पुरुष व ३ महिला नक्षली ठार झाले. या चकमकीतही मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.