पावसाने जूनपाठोपाठ जुलै महिन्यातही चांगली हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल १२० ते १७५ टक्के पाऊस पडला आहे. विदर्भात सर्वाधिक १७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, देशातही ८८ टक्के प्रदेशावर सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांच्या अपुऱ्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी चांगले पाऊसमान आहे. जुलै महिन्यात त्याचे आगमन वेळेवर झाले, त्याचबरोबर पाऊसही चांगला पडला. त्यानंतर आता जुलै महिन्यातही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाने केव्हाच सरासरी भरून काढली आहे. १ जून ते १६ जुलै या काळात विदर्भात सरासरीच्या १७५ टक्के पाऊस झाला. मराठवाडय़ात त्याचे प्रमाण १२० टक्के आहे. मध्य महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सरासरीच्या १२४ टक्के, तर कोकणात १४८ टक्के इतका पाऊस बरसला आहे. उपविभागांप्रमाणेच सर्व जिल्ह्य़ांमध्येही सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एकाही जिल्ह्य़ात पावसाच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती नाही. विदर्भात वाशिम जिल्ह्य़ात सरासरीच्या दुप्पट, तर नागपूर जिल्ह्य़ात १९० टक्के पाऊस पडला आहे. विदर्भापाठोपाठ कोकणात पावसाचे प्रमाण जास्त आहे.
देशात ३१ उपविभागांत चांगला पाऊस
देशात हवामानाच्या ३६ पैकी ३१ उपविभागांमध्ये सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ही स्थिती देशाच्या तब्बल ८८ टक्के प्रदेशावर आहे. केवळ पूर्व भारत व ईशान्य भारतात सध्या कमी पाऊस आहे. त्यात झारखंड, पश्चिम बंगालचे गंगेचे खोरे, आसाम, अरुणाचल प्रदेश व ईशान्येतील छोटय़ा राज्यांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यातही विदर्भ व कोकणात काही ठिकाणी बुधवापर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातही पाऊस कायम राहील. दक्षिण महाराष्ट्रात त्याचा जोर कमी असेल, असे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले.

धरणे ४२ टक्के भरली
महाराष्ट्रातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ४२ टक्क्य़ांवर पोहोचला असून, त्यात कोकण विभाग आघाडीवर आहे. या विभागातील धरणे ७६ टक्के भरली आहेत. त्यापाठोपाठ नागपूर (६२ टक्के), अमरावती (५४ टक्के), पुणे (४३) या विभागातील धरणेही समाधानकारक भरली आहेत. मात्र, नाशिक (२० टक्के) व मराठवाडा (१० टक्के) विभागात धरणे भरण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

मंगळवारचा पाऊस
पुणे ४.७, अहमदनगर ७, कोल्हापूर ४, सातारा ३, सोलापूर ०.१, नाशिक २, जळगाव १, मुंबई कुलाबा ५, सांताक्रुझ ९, अलिबाग ५, रत्नागिरी २, डहाणू २३, भीरा २७, औरंगाबाद ३, परभणी ७, अकोला २, गोंदिया ६, नागपूर १८, वाशिम २७, वर्धा ४.