दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी जमातीच्या मरकजसाठी देशात आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना तसेच तिघा परप्रांतीय अशा २९ जणांना पोलिसांनी अटक केली. २६ परदेशी नागरिकांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून तिघा परप्रांतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिघांना २५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींना औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटक करताना पोलिसांनी सामाजिक अंतराचा नियम पाळला. तसेच आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्यांना एका कक्षात नेण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयाने कामकाज चालविले. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलीसगाडी, कोठडी हे सर्व निर्जंतुक केलेले होते. पोलिसांनी मास्क तसेच अन्य सुरक्षा व आरोग्याचे आदेश पाळले होते. टाळेबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच एव्हढय़ा मोठय़ा प्रमाणात आरोपी अटक केले. परदेशी नागरिकांची एव्हढय़ा मोठय़ा संख्येने अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे समोर आले होते. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटींचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगरला आलेले २६ परदेशी नागरिक व परराज्यातील तीन नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिल्लीतील मरकजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी अनेक देशातील नागरिक दिल्लीत आले होते. त्यातील काही जण शहरातील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते. या तीन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करुन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये काही जणांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले. जिबुती, बेनिन, डिकोटा,आयव्हेरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. चौघांना करोनाची लागण झाली होती, तर इतरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. करोना झालेले चार जण करोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तर, विलगीकरण कक्षातील २२ जणांची करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने या सर्वांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयासमोर हजर केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.