सांगली : ऑनलाईन मार्केटिंगचे पार्सल पोहच करणाऱ्याला बोलण्यात गुंतवून किमती मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करुन सात लाखाचे १४ मोबाईल जप्त केले.
गेल्या आठ दिवसात सांगलीसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, पलूस, इस्लामपूर, विटा आदी ठिकाणी ऑनलाईन खरेदी वस्तू घरपोच करणाऱ्यांना फसविण्याचे प्रकार घडले होते. पार्सल पोहच करणाऱ्याला नेट बॅंकिंगद्वारे पैसे दिल्याचे भासवले जात होते, तर कधी बोलण्यात गुंतवून जोडीदार किंमती मोबाईल काढून त्याऐवजी साबनवडी टाकून पुर्ववत पॅकिंग करुन पैसे नसल्याचे सांगून परत पाठवत होते.
हेही वाचा >>> “अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि …”, अंजली दमानियांच्या ट्वीटची जोरदार चर्चा
कुपवाड रस्त्यावरील भारत सूतगिरणी येथे दोघे किमती मोबाईल घेऊन उभे असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी महमंद उर्फ जॉर्डन इराणी व उम्मत इराणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यांनी आयफोन, सॅमसंग कंपनीचे ४० ते ७० हजाराचे १४ मोबाईल फसवणूक करुन लंपास केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी दोघांना चार दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई अधिक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षन उपअधिक्षक संदेश नाईक, मनिषा कदम, निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, कॅप्टन गुंडवाडे, प्रशांत माळी व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.