संगमनेर: संगमनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल २० अर्ज दाखल झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाची धुरा आमदार सत्यजित तांबे यांनी खांद्यावर घेतली असून ‘संगमनेर सेवा समिती’ च्या माध्यमातून हा गट निवडणुकीला सामोरा जात असून त्यांनी आपली संपूर्ण यादी आज, सोमवारी जाहीर केली. विरोधी महायुतीमध्ये सध्या तरी बिघाडी झाल्याचे चित्र असून महायुतीतील सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. डॉ. मैथिली तांबे (थोरात- तांबे गट, संगमनेर सेवा समिती), सुवर्णा खताळ (शिवसेना शिंदे गट), सुजाता देशमुख ( भाजपा), सुनिता केसेकर (शिवसेना), रूपाली पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) या प्रमुख उमेदवारांचा अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. अर्थात माघारी नंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. नगरपालिकेच्या एकूण ३० जागांसाठी १७७ अर्ज दाखल झाले आहेत.
आमदार तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीमार्फत नगराध्यक्ष पदासाठी डॉ. मैथिली तांबे निवडणुकीस सामोरे असल्याचे स्पष्ट झाले. महायुती मधील तीनही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळणे आणि माघार घेणे यानंतर खरे चित्र समोर येईल. सध्या तरी सुवर्णा खताळ या महायुतीच्या उमेदवार असतील याची जास्त शक्यता आहे. अर्थात भाजप पक्षीय पातळीवर काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून आहे.
संगमनेर सेवा समितीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक या माजी नगराध्यक्षांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली आहे. याशिवाय शोभा पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, किशोर टोकसे हे माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला प्रतिनिधित्व देताना माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांच्या पत्नी कविता, प्रसाद पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विरोधी गटाच्या उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत घोषणा केली नव्हती.
तांबे-खताळ आमने-सामने
थोरात गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेल्या डॉ. मैथिली या आमदार तांबे यांच्या पत्नी आहेत. त्या प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात उतरत आहेत. सुवर्ण खताळ या आमदार अमोल खताळ यांच्या भावजय आहेत. त्यांचे पती दिवंगत संदीप खताळ हे सत्यजित तांबे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. डॉ. सुधीर तांबे अध्यक्ष असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेत सुवर्णा खताळ या शिक्षिका आहेत. खताळ यादेखील पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असल्या तरी त्यांना दीर आमदार अमोल खताळ यांचे मोठे पाठबळ असणार आहे. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या पत्नी रूपाली यांचाही अर्ज दाखल आहे. दोन्ही बाजूंकडून एकास एक उमेदवार दिला जातो की बहुरंगी लढत होते हे अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल.
