केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी रेल्वेमंत्री सदानंद गौडा आपले चांगले मित्र असल्याने रेल्वे अंदाजपत्रकात परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटींची तरतूद करून घेऊन हा मार्ग ३ वर्षांत पूर्ण करणार असल्याचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर या मार्गाची अवघ्या २० कोटींच्या तरतुदीवर बोळवण करण्यात आली आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर पहिल्या ५ वर्षांत परळी-बीड-नगर हा २५० किलोमीटर मंजूर रेल्वेमार्ग पूर्ण करण्यास सातत्याने प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर मागील अनेक वर्षांपासून या मार्गासाठी आंदोलने झाली. विशेष बाब म्हणून या मार्गासाठी राज्य सरकारने खर्चाचा अर्धा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेल्वे अंदाजपत्रकात पुरेशी तरतूदच होत नसल्याने मंजूर होऊन २० वर्षांपासून हा मार्ग रखडला.
मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणून निवड झाल्यावर हा मार्ग पूर्ण होईल, असा विश्वास निर्माण झाला होता. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जवळच्या लोकांसोबत बोलताना मुंडे यांनी परळी-बीड-नगर व सोलापूर-बीड-धुळे हे दोन रेल्वेमार्ग मराठवाडय़ाच्या विकासाला गती देणारे असल्यामुळे ३ वर्षांत पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. रेल्वेमंत्री गौडा मंत्रिमंडळातील सहकारी व चांगले मित्र असल्यामुळे त्यांच्याकडून भरीव निधी मिळवण्याचा त्यांचा मानस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करून या अविकसित जिल्हय़ास विशेष बाब म्हणून जास्त निधी घेण्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस या नात्याने कर्नाटकात पक्षाचे काम करताना गौडा यांच्याशी जवळचा संपर्क आला. त्यातून त्यांची व आपली मत्री झाली. ते अनेकदा परळीतही आले होते, अशी आठवणही मुंडे सांगत. त्यामुळे केंद्राचे एक हजार कोटी व राज्य सरकारचे एक हजार कोटी असे याच वर्षांत या मार्गासाठी २ हजार कोटींची तरतूद झाल्यानंतर या कामाला गती आणण्याची वेगळी योजनाही त्यांनी बोलून दाखवली होती.
उत्तर भारतात रेल्वेचे काम करणाऱ्या काही मोठय़ा कंपन्या आहेत. त्या कंपन्यांना पाचारण करून हे मार्ग उभारण्याचा निश्चय त्यांनी केला होता. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले आणि सगळेच मागे पडले. गौडा यांनी सादर केलेल्या रेल्वे अंदाजपत्रकात या मार्गासाठी नाममात्र २० कोटींची तरतूद करण्यात आली.
फडणवीसांकडून दिशाभूल
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी २०० कोटींची तरतूद झाली. हीच मुंडेंना खरी श्रद्धांजली असल्याचे सांगून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. मात्र, अल्प तरतूद व फडणवीस यांची दिशाभूल यामुळे जिल्हय़ात संताप व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
परळी-नगर रेल्वेमार्गाची २० कोटींवरच बोळवण
केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी रेल्वेमंत्री सदानंद गौडा आपले चांगले मित्र असल्याने रेल्वे अंदाजपत्रकात परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटींची तरतूद करून घेऊन हा मार्ग ३ वर्षांत पूर्ण करणार असल्याचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले होते.
First published on: 11-07-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 cr for parli nagar railway line