हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेले कल्याणचे 20 जण अडकले आहेत. कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलिसांना यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका कशी होईल ते पाहण्यास सांगितले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व ट्रेकर्स सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. ट्रेकर्सकडे १५ भाकरी, पाणी आणि ऊबदार कपडे असून त्यांनी शेकोटीही पेटवल्याची खात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यातील डॉ. हितेश अडवाणी आणि काही जणच व्यावसायिक ट्रेकर्स आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते.  त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला असून हे सर्व कोकणकडापासून खाली 1000 फूट अंतरावर आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. अंधार पडल्याने सध्या तरी कोकणकडा येथे या अडकलेल्या 20 ट्रेकर्सना रात्र काढावी लागणार आहे. जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. याशिवाय ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी देखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 trekkers from kalyan stucked in harishchandragad
First published on: 25-11-2018 at 21:47 IST