विरार : मुंबईत भरणाऱ्या उद्योग रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नालासोपारा येथील अनेक महिलांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. नालासोपारा येथील २१० महिलांना याप्रकरणी गंडा घालण्यात आला असून त्यापैकी अनेक महिलांना बनावट १५ लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट (डीडी) देण्यात आले आहेत. या संदर्भात फसवणूक झालेल्या महिलांच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपींविरोधात वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्फा गोल्ड नावाची कांजुरमार्गमध्ये कंपनी होती. या कंपनीचा मालक आरोपी मुकरम अली मोहम्मद अन्सारी याने आपली सहकारी मनीषा पाटील (सानिका गमरे) या महिलेद्वारे असंख्य महिलांची फसवणूक केली आहे. उद्योग रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आणि अन्य प्रक्रियेसाठी प्रत्येकीकडून ३५ हजार रुपये रोखीने घेतले. त्यानंतर प्रत्येकीला १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून डीडी देण्यात आले. मात्र हे डीडी बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महिलांची ४१ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या इतरही महिलांच्या तक्रारी आम्ही नोंदवून घेत आहोत. या घटनेतील तक्रारदारांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती  तपास अधिकारी विपुल सोनावणे यांनी दिली आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अन्सारीला ग्रांट रोड येथे अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्यभरात अनेकांची फसवणूक

नालासोपाऱ्यातील २१० महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले असले तरी राज्यभरातील साडेतीन हजारांपेक्षा अधिक महिलांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पनवेल, पुणे, गोवंडी, भिवंडी, शीव या परिसरातही अनेक महिलांची फसवणूक झाली आहे. जवळपास १८ कोटींचा हा घोटाळा आहे.

कर्करोगावर उपचार नाहीच

शीवमध्ये राहणाऱ्या अल्पना सोनावणे या महिलेच्या पाच वर्षांच्या मुलाला कर्करोग झाला होता. अन्सारीने या महिलेच्या मुलाला चांगल्या रुग्णालयात दाखल करून उपचार करून देईन, असे आमिष दिले. या महिलेच्या अमिषाला बळी पडत महिलेने अन्सारीला ५० हजार दिले. त्यानंतर अन्सारीने त्या महिलेकडे फिरकलाही नाही. शेवटी त्या मुलाचा मृत्यू झाला आणि अल्पना यांना पैसेही मिळाले नाही.