जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे २३ टक्के महिला हृदयविकारग्रस्त असल्याचा खळबळजनक अहवाल नागपुरातील नागपूर स्कॅन सेंटरने प्रसिद्ध केला आहे. २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. हृदयविकाराला आळा घालून त्याला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती निर्माण व्हावी, या हेतूने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे सेंटरने स्पष्ट केले आहे. भारतात २०२० पर्यंत मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांमध्ये हृदयविकाराच्या आजारांचा मोठा वाटा असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात म्हटले आहे की, शहरातील २३.८८ टक्के महिला हृदयविकाराने, २३.१८ टक्के महिला मधुमेहाने, ६.४२ टक्के अतिताणाने, ५.५९ टक्के लठ्ठपणाने आणि ७.१२ टक्के महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. शहरातील ७१६ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावर हा अहवाल आधारित असल्याचे म्हटले आहे. ४० ते ६० वर्षे वयोगटातील स्त्रिया सीव्हीडींना जास्त बळी पडू लागल्या असून त्याला जीवनशैलीतील बदल कारणीभूत आहेत. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब, असे जीवनशैलीशी संबंधित आजारही नागपुरात वाढू लागले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचे धोके वाढू लागले आहेत. महिलांमध्ये हृदयविकाराची पुरुषांपेक्षा वेगळी लक्षणे दिसत असून त्यात श्वास कमी होणे, छातीत दुखणे, उलटीची भावना, घाम फुटणे, थकवा आणि चक्कर येणे, यांचा समावेश आहे.
हृदयविकाराशी संबंधित आजार केवळ प्रौढ पुरुषांमध्येच दिसून येतात, असे नाही तर भारतातील स्त्रिया आणि मुलेही त्याला मोठय़ा प्रमाणात बळी पडू लागली आहेत. तरुण वयोगटात पुरुष आणि स्त्रियांचे धोक्यांचे प्रमाण ३:२ असे आहे, परंतु, रजोनिवृत्तीनंतर (मेनॉपॉझ)हे प्रमाण १:१ असे होते, असेही संघटनेच्या अहवालात नमूद केले आहे. मानसिक आणि शारीरिक तणाव ही स्त्रियांमधील हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत.
कारण, हल्लीच्या काळात अनेक महिलांना कार्यालय आणि घरही सांभाळावे लागते. त्यामुळे त्यांना आराम कमी मिळतो आणि झोपही कमी होते. पाळीच्या काळातील स्त्रिया हृदयविकारापासून सुरक्षित असतात, असे लोकांना पूर्वी वाटत होते, परंतु पाळी येत असतानाही स्त्रिया हृदयविकाराला बळी पडत असल्याचे आता दिसून येऊ लागले आहेत. तंबाखूचे व्यसन, दारूचे व्यसन यांना आळा घालून सकस आहार, कोलेस्टोरॉल, अतिरक्तदाबावर नियंत्रण, वेळोवेळी आणि नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी यांच्यामुळे ८० ते ९० टक्के सीव्हीडी धोक्याचे घटक कमी करता येऊ शकते, असेही सेंटरने केलेल्या अहवालात म्हटले आहे.